चोरट्यांची ‘दिवाळी’ तर व्यापाऱ्याचे ‘दिवाळे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 07:25 PM2020-11-14T19:25:44+5:302020-11-14T19:25:50+5:30
बोदवड येथे आडत दुकान फोडून लाख रुपये किमतीच्या २२ क्विंटल कापसाची चोरी
बोदवड : चोरीच्या घटनांनी आता पुन्हा तोंड वर काढण्यास सुरुवात केली असून चार दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना चोरट्यांनी लाख रुपयांची कापूस चोरी करून जणू सलामीच दिली आहे.
शहरातील जामनेर रस्त्यावर हायस्कूलसमोर असलेल्या अनिल गुलाबचंद अग्रवाल यांचे आडत दुकान असून या दुकानात जवळपास पन्नास क्विंटल कापूस खरेदी करून भरून ठेवलेला होता. १३रोजी नेहमी प्रमाणे दुकानदार रात्री सात वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले व १४ रोजी
सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, दुकानच्या शटरचे कुलूप तोडलेले व दुकान अर्धे उघडे आढळले. याबाबत त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता दुकानात आदल्या दिवशी पूर्ण भरलेला कापूस अर्धा खाली झालेला दिसून आला तर दुकानमधील गल्ला तसेच आतील हिशेबच्या वह्याही फेकलेल्या आढळून आल्या. याबाबत त्यांनी बोदवड पोलिसात धाव घेत घटना कथन केली.
यात त्यांच्या दुकानातील २३ क्विंटल कापूस चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले, असून आजच्या बाजार भावप्रमाणे एक लाख रुपयांचा कापूस चोरीस गेला.
घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता दुकानाचे वरून पत्रेे तोडून दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सारंगी तलाववरून चोरट्यानी कब्रस्तानमध्ये वाहन उभे करून कापूस गोण्यांमध्ये भरून वाहून नेल्याचे ठिकठिकाणी पडलेल्या कापसाच्या बोंडावरून दिसून आले,
सदरच्या प्रकारने चोरट्यांची दिवाळी तर झाली, मात्र व्यापाऱ्याचे दिवाळे निघाल्याचे दिसून आले.
याबाबत बोदवड पोलीस स्टेशनला व्यापारी अनिल गुलाबाचंद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३८०,४५७,प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.