दिवाळीची उलाढाल १७० कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:08 PM2019-10-29T12:08:12+5:302019-10-29T12:13:10+5:30
वाहनबाजारही फुलला
जळगाव : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर जळगाव येथे सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेली सुवर्णखरेदी अद्यापही सुरूच आहे. वसू बारस ते भाऊबीज दररोज ग्राहकांनी वेगवेगळे मुहूर्त साधल्याने दिवाळीच्या पर्वात ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली. या सोबतच वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजारातही मोठी गर्दी होऊन घर खरेदीसही चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्सवातील बाजारपेठेतील उलाढाल १७० कोटी रुपयांवर गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पावसाने अडथळा आणल्याने त्याचा परिणाम झाला, अन्यथा ही उलाढाल आणखी वाढली असती, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. यंदा नवरात्रोत्सवापासून शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या आहेत. तेव्हापासून अद्यापही सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी कायम आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीस मोठा वेग आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गर्दी कायम होती. त्यापाठोपाठ रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सलग तिसºया दिवशी गर्दीत आणखी भर पडली. या दिवशी देखील अनेक जण सोने खरेदीला महत्त्व देतात. याच दिवशी सोने खरेदी करीत संध्याकाळी त्यांचे पूजन केले जाते. रविवार असला तरी शहरातील सुवर्णपेढ्या खुल्या होत्या.
पाडव्याचा साधणार मुहूर्त
साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या दीपावली पाडव्यालादेखील सोने खरेदीस अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला होण्याचा अंदाज आहे. या दिवशी इतरही वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.
सोन्याची उलाढाल ५५ कोटींवर
सोने व्यवसायातील एकूण विक्रीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नसला तरी शहरातील १५०च्यावर असलेल्या सुवर्णपेढ्यांमध्ये दिवाळीच्या हंगामात ५५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. धनत्रयोदशीला सोन्याचे भाव ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. हा मुहूर्त झाल्यानंतर सोन्याचे भाव कमी झाले व रविवारी लक्ष्मीपूजनाला ते ३९ हजार रुपये प्रती तोळ््यावर आले. चांदीचेही भाव धनत्रयोदशीला ४८ हजार ८०० रुपयांवर होते, ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४८ हजार रुपये प्रती किलोवर आले.
११०० दुचाकींची विक्री
दुचाकी व चारचाकींना मोठी मागणी राहिली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ७०० पेक्षा जास्त दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील एकाच दालनात रविवारी संध्याकाळपर्यंत ४०० दुचाकींची विक्री झाली होती. दीपोत्सव काळात १४०० दुचाकींची विक्री होऊन यात जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
मागणीमुळे अधिक वाहनांचा स्टॉक
दिवाळीसाठी गेल्या महिनाभरापासून वाहनांचे बुकिंग करून ठेवण्यात येत असल्याने ग्राहकांची मागणी पाहता ऐन वेळी वाहन कमी पडू नये म्हणून विक्रेत्यांनी दुचाकींचा अधिक स्टॉक करून ठेवला.
४०० चारचाकींची विक्री
चारचाकींची विक्रीदेखील तेजीत आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर १०० चारचाकींची विक्री झाली. या हंगामात ४००चारचाकी विक्री झाल्याचे सांगण्यात आले. यात एकाच दालनात २०० चारचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. चारचाकींसाठी मोठी मागणी असली व बुकिंगही जोरात असले तरी चारचाकींचा तुटवडा असल्याचेही एकीकडे चित्र आहे.
एलईडीला मागणी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातदेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एलईडीला सर्वात जास्त मागणी असून त्या खालोखाल फ्रीज व वॉशिंगमशीनला मागणी राहिली. सोबतच एसी, मोबाईल यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामध्ये जवळपास १५ कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
घर खरेदीतही ६० कोटींची उलाढाल
दिवाळीच्या काळात जवळपास ४०० जणांनी घराची खरेदी केली. घर खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात होती. यासाठी कुटुंबासह अनेकजण येऊन शाळा, महाविद्यालय व इतर सोयींचा विचार करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी केली. यातून जवळपास ६० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
कापड बाजारतही उत्साह
सण-उत्सव म्हटले म्हणजे प्रत्येक जण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार दिवाळीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. तसेच फटाके व पुजेचे साहित्य, फराळ आदीची खरेदी सुमारे ५ कोटींची झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पावसाचा परिणाम
यंदा बाजारपेठेत सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी उत्साह दिसून आला. त्यात यंदा पावसाचा मोठा अडथळा झाला. पावसामुळे खरेदीस बाहेर पडता येत नसल्याने त्याचा मोठा खंड पडला. मात्र शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी पावसाने उसंत दिल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. शनिवारी व रविवारी पुन्हा पावसाने अडथळा आणला. अन्यथा ही उलाढाल आणखी वाढली असती, असे सांगण्यात येत आहे.
घर खरेदीसाठी यंदा चांगला उत्साह आहे. घराचे भाडे भरण्यापेक्षा ते कर्जाचा हप्ता भरणे पसंत करतात. त्यामुळे अनेकांकडून घराची खरेदी होत आहे. यात १० ते ३० लाखापर्यंतच्या घरांना जास्त मागणी आहे.
- वर्धमान भंडारी, बांधकाम व्यावसायिक
दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. धनत्रयोदशीपासून ग्राहकांची गर्दी वाढत गेली व ती लक्ष्मीपूजनालाही कायम होती.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
यंदा दिवाळीच्या काळात चारचाकी खरेदीसाठी मोठा प्रतिसाद राहिला. भाऊबीजेला चारचाकींचे बुकिंग आहे.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.
दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली. आमच्या दालनातून दिवाळीमध्ये जवळपास ४०० दुचाकींची विक्री झाली.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
दिवाळीमध्ये बाजारपेठेत विविध प्रकारच्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ग्राहकांनी सर्वच प्रकारच्या फटाक्यांना पसंती दिली.
- युसुफ मकरा, कार्याध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायर वर्क्स असोसिएशन.