बोदवड तालुक्यातील येवती येथे सोमवारी साजरी होणार करदोडा दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 02:55 PM2018-11-10T14:55:03+5:302018-11-10T14:56:40+5:30
जामठी, ता.बोदवड : तालुक्यातील येवती येथील अंबत्रुषी महाराज यांची करदोडा दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.
जितेंद्र पारधी
जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील येवती येथील अंबत्रुषी महाराज यांची करदोडा दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.
येथील अंबत्रुषी महाराज यांची १०५ वर्षांपासून अखंड परंपरा सुरू आहे. गावानजिक असलेल्या जगदेव माळी यांच्या शेतातील अंबत्रुषी महाराज यांचे भव्य असे मंदिर आहे. या मंदिरात गावातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या मंदिरातील अंबत्रुषी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या मूर्तीस महिलांकडून अंबत्रुषी महाराज यांच्या मूर्तीस करदोडा बांधण्यात येतो. नंतर सामूहिक आरतीचे गायन करण्यात येते व नैवेद्य अर्पण करण्यात. नंतर मंदिर परिसरात व गावात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येते.
करदोडा दिवाळीची आख्यायिका-
तालुक्यातील येवती येथील अंबत्रुषी महाराज यांची करदोडा दिवाळीची १०५ वर्षांपासून अखंड परंपरा सुरू आहे. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी गावातील लोकांना त्वचेच्या असाध्य रोगांनी ग्रासले होते व गावातील अनेक लोक अत्यंत जरजर झाले होते. गावानजिक असलेल्या एका शेतामधे अंबत्रुषी नामक महाराजांचे एका झोपडीत वास्तव्य होते. त्यांनी गावातील लोकांना झालेल्या असाध्य रोगांचे निराकरण करून या रोगातून मुक्त केले. महाराजांच्या दैवी शक्तीमुळेच आमची मुक्तता झाली, त्यामुळे गावातील लोक महाराजांची सेवा करू लागले. मात्र काही वर्षांनंतर अंबत्रुषी महाराज यांचे ऐन दिवाळीच्या दिवशी निधन झाल्याने येवती व रेवती या गावातील नागरिक आजपर्यंत दिवाळी हा सण साजरा करत नाही, अशी आख्यायिका जुणे-जाणकार सांगतात. दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी करदोडा दिवाळी हा सण साजरा करतात.