दिवाळी होणार ‘नमकीन’, डाळींच्या भावात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:20 PM2017-10-15T12:20:47+5:302017-10-15T12:22:18+5:30
भाव सहा महिन्यांच्या निच्चांकीवर
विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15 - आवकच्या तुलनेत मागणी नसल्याने डाळींचे भाव गडगडल्याने ग्राहकांना दिलासा मिळला असून दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. एरव्ही दिवाळीमध्ये हरभ:याच्या डाळीसह बेसनपीठाला मागणी वाढून भावही कडाडतात. मात्र यंदा उलट चित्र असून सणासुदीत भाव कमी झाले आहे.
आवक वाढली
प्रत्येक डाळ, कडधान्याचा विचार केला तर सर्वाची आवक वाढली आहे. महाराष्ट्रात उडीद-मुगाचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न व आवक नसले तरी इतर राज्यातून मुगाची चांगली आवक होत आहे. दुसरीकडे मात्र पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने डाळींचे भाव कमी होत आहे.
उडीदाच्या बाबतीतही असेच चित्र असून मध्यप्रदेशात उडीदाचे चांगले उत्पादन आल्याने तेथून येणा:या मालाला 4000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
दिवाळीत ज्या डाळीला सर्वात जास्त मागणी असते त्या हरभरा डाळीतही असेच चित्र आहे. दिवाळीमध्ये लाडू, बर्फी व इतर पदार्थ तयार करण्यासाठी हरभरा डाळ, बेसनपीठ यांना जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांचे भाव या दिवसात वाढतात. मात्र यंदा आवकच जास्त असल्याने भाव वाढण्यापेक्षा उलटकमी झाले आहे.
बेसनपीठाचेही भाव घसरले
बेसनपीठाचे भाव यंदा तर शंभरीच्या आत आले आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो असणारे भाव यंदा 80 ते 90 रुपये प्रति किलोवर आले आहे.
तेलातही वाढ नाही
दिवाळीमध्ये खाद्य तेलाचेदेखील भाव वाढतात. मात्र यंदा तेलाचे भावदेखील स्थिर आहे. सोयाबीन तेल 72 ते 78 रुपये प्रति किलो तर शेंगदाणा तेल 115 ते 130 रुपये प्रति किलो (दर्जा व कंपनीन्यांनुसार यापेक्षा जास्त दर) आहे.
डाळींसह बेसनपीठाचे भाव कमी होणे व तेलाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांची दिवाळी गोड होणार आहे. सध्या फराळाचे विविध पदार्थ करण्यास जोमाने सुरुवात झाली आहे.
डाळींचे भाव गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे व्यापा:यांनी सांगितले. सध्या तूर डाळीचे भाव 55 ते 60 रुपये प्रति किलो, हरभरा डाळ - 62 ते 70, मूग डाळ - 60 ते 64, उडीद डाळ 60 ते 64 रुपये प्रति किलो आहे. गेल्या महिन्यात हेच भाव 10 ते 20 रुपयांनी जास्त होते.
दरवर्षी दिवाळीमध्ये डाळींची मागणी वाढते, मात्र यंदा आवक वाढली असली तरी मागणी पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे भावदेखीलघसरलेआहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल असोसिएशन.
महाराष्ट्रात कडधान्याचे उत्पादन कमी असले तरी इतर राज्यातून माल येत असल्याने आवक वाढून डाळींचे भाव कमी झाले आहे. दिवाळीमध्ये असणारी मागणी पाहिजे तेवढी नाही.
- प्रविण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणार्मचट असोसिएशन.