अस्मितादर्श साहित्य संमेलनाध्यक्षपदी डी.बी.जगत्पुरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:34 PM2018-08-28T17:34:38+5:302018-08-28T17:35:29+5:30
जालना येथे होणार २७ व २८ आॅक्टोबरला साहित्य संमेलन
जळगाव : ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवी, समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार डी.बी. जगत्पुरिया यांची निवड करण्यात आली आहे. जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर रोजी हे संमेलन होणार आहे.
जालना येथे अस्मितादर्श कार्यकारी मंडळाची बैठक झाली. त्यात ही जगत्पुरिया यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे यांनी निर्वाणापूर्वी नियोजित ३५व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जगत्पुरिया यांचे नाव निश्चत केले होते हे विशेष. जालना येथे आयोजित अस्मितादर्श कार्यकारी मंडळाच्या बैठकीस डॉ.नवेदिता पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, प्रमोद खोब्रागडे, एम.डी.बनकर आदींची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत ३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन जालना येथे २७ व २८ आॅक्टोबर दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय साहित्य संमेलनातील कार्यक्रम, उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.
ग्रंथ संपदा
अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले डी.बी.जगत्पुरिया यांच्या नावावर १८ ते २० ग्रंथ संपदा आहे. पाच मराठी कवितासंग्रह, दोन सामाजिक व वैचारिक ग्रंथ, पाच समीक्षा ग्रंथ, दोन व्यक्ती चित्रणात्मक ग्रंथ आहे. याशिवाय हिंदी भाषेतही त्यांनी विपूल लेखन केले आहे.