मनपाने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:46+5:302021-04-08T04:16:46+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनधिकृत हॉकर्सला दिला निर्वाणीचा इशारा : महापालिकेत बैठक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनधिकृत हॉकर्सला दिला निर्वाणीचा इशारा : महापालिकेत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, शहरातील हॉकर्स महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी शहरातील हॉकर्सला दिला आहे.
मंगळवारी मनपा उपायुक्तांच्या वाहनावरदेखील काही हॉकर्सने दगडफेक केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत शहरातील हॉकर्स संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. प्रवीण मुंडे यांनी हॉकर्सला मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची वाढत जाणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेला सहकार्य करून ज्या ठिकाणी व्यवस्थेसाठी परवानगी देण्यात आली आहे, त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी हॉकर्सला दिल्या.
महापालिकेकडून हॉकर्सला त्या निश्चित केलेल्या जागांचा पर्याय
गेल्यावर्षी महापालिकेने लॉकडाऊनच्या काळात शहरातील हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी नऊ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावेळीदेखील हॉकर्सने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. गोलाणी मार्केटमधील तळ मजला, खाजामियाची जागा, शिवतीर्थ मैदान, सत्य वल्लभ सभाग्रह, आयएमआर महाविद्यालयाचे पार्किंग, मानराज पार्क परिसर, नाट्यगृह परिसर या भागात हॉकर्सला व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. सर्व हॉकर्सने या जागांवर व्यवसाय करावा या जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी व्यवसाय केलास महापालिकेसह पोलीस प्रशासनाकडूनदेखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
एसपी व उपायुक्तांनी केली पाहणी
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्यानंतर गुरुवारी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे हे स्वतः हॉकर्स आणि अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. काही भाजीपाला विक्रेत्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या, तसेच काही फळे विक्रेत्यांना मास्क घालूनच व्यवसाय करावा, अशा सूचनादेखील पोलीस अधीक्षकांनी दिल्या.