माझ्यावर अन्याय करा पण खान्देशवर करू नका - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:14 PM2019-06-25T12:14:42+5:302019-06-25T12:15:18+5:30
सरकारला सुनावले
जळगाव : खान्देशातील रखडलेल्या विविध प्रकल्पांवर कोणतेही निर्णय न झाल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त करत एकनाथराव खडसेवर अन्याय झाला तो मान्य पण माझ्या खान्देशावर करू नका, अशी भूमिका सोमवारी विधानसभेत व्यक्त केली.
विधानसभेत पशुसंवर्धन विभागाशी संबंधीत एका विधेयकावर चर्चा सुरू होती. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिलेल्या उत्तरानंतर खडसे बोलत होते.
अनेक प्रकल्प रखडले
चार वर्षांपूर्वी आपण मंत्री असताना जळगाव जिल्ह्यासह महाराष्टÑातील अनेक महत्वाच्या विषयांवर निर्णय घेतले. ते अद्यापही प्रलंबित आहेत. मुक्ताईनगर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा निर्णय घेतला. त्यासाठी ८० एकर जागा शासनाला उपलब्धही करून दिली. यासाठी शासनाची एक समितीही येऊन गेली. या समितीने सकारात्मक अहवाल दिला. त्यानंतर हॉर्टिकल्चर कॉलेजला तत्वत: मंजुरी मिळविली त्यासाठीही १०० एकर जागा दिली, मंत्रिमंडळाने त्याची घोषणाही केली. तरीही नंतर प्रगती होऊ शकली नाही. यावल तालुक्यातील हिंगोणा येथे भाजीपाला संशोधन केंद्र मान्यता दिली. ६० एक जागा त्यासाठी वर्ग करण्यात आली, हा विषयही मागे पडला. त्यानंतर मत्स महाविद्यालयास तत्वत: मान्यता मिळाली तो विषयही प्रलंबित ठेवला गेला.
विद्यापीठ विभाजन झालेच नाही
कृषि विद्यापीठाच्या विभाजनावर चर्चा झाली. महात्मा फुले कृषि महाविद्यालय व पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचा तो विषय होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी तरतूद केली. यासाठी नियुक्त समितीने विभाजनाच्या विषयाला मंजूरीही दिली. पण नंतर हा विषयही मागे पडला. प्रलंबित विषय पूर्ण करा असे आवाहन खडसे यांनी केले.