जळगावातच करा एमडी, एमएस; वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१ जागांना मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 07:53 PM2023-04-01T19:53:40+5:302023-04-01T19:53:47+5:30
वैद्यकीय शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली बॅच बाहेर पडत नाही तोच जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१ जागांना मान्यता मिळाली आहे.
जळगाव :
वैद्यकीय शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली बॅच बाहेर पडत नाही तोच जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१ जागांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असून जळगावातच एमडी आणि एमएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणासह अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध व्हावी म्हणून एप्रिल २०१७मध्ये वैद्यकीय संकूल अर्थात ‘मेडिकल हब’ची घोषणा करण्यात आली. चिंचोली येथे हे मेडिकल हब उभारले जाणार असले तरी त्याची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून झाली. या ठिकाणी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. यानंतर २०१७ची पहिली बॅच बाहेर पडताच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जळगावमध्ये मार्च महिन्यात सुविधा, मनुष्यबळ आदी बाबींची तपासणी केली होती. विविध विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाबद्दल माहिती देऊन सादरीकरण केले होते. या सर्व पाहणीनंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एमडी व एमएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
अशा आहेत २१ जागा
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग व औषधवैद्यकशास्त्र विभागाला प्रत्येकी ७ जागा मंजूर झाल्या आहेत. तर बधिरीकरणशास्त्र विभागाला ४, बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग २, अस्थिव्यंगोपचार विभागाला १ जागा मंजूर झाली आहे. अशा ५ विभागांसाठी २१ जागा एमडी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मंजूर झाल्या आहेत.
आगामी शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तरसाठी प्रवेश
एमडी तथा एमएस अभ्यासक्रमासाठी जागा मिळाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी अधिष्ठाता आणि विभागांचे कौतुक केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात आणखी इतर विभागांनाही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विभागांना यामुळे आणखी बळ व प्रोत्साहन मिळणार असून अधिकाधिक ऊर्जेने विभाग कार्यरत राहतील.
- डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.
पदवुय्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्याने पदवीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तरसाठी येथेच संधी मिळू शकते. आगामी शैक्षणिक वर्षापासून यासाठी प्रवेश सुरू होतील.
- डॉ. मारुती पोटे, उप अधिष्ठाता