क्षणिक आनंदासाठी कायदा मोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:16 AM2018-09-06T00:16:56+5:302018-09-06T00:17:17+5:30
साकेगाव येथे शांतता समितीच्या बैठकीत डीवायएसपी गजानन राठोड यांचे आवाहन
भुसावळ, जि.जळगाव : सण-उत्सव हे आनंदासाठी व एकोप्यासाठी असतात. यात कायदा व सुव्यवस्था मोडून क्षणिक आनंदासाठी स्वत:वर गुन्हे ओढवून घेऊ नका व भविष्यात अडचण निर्माण होईल, असे वागू नका. सण उत्सवासाठी शांतता कमिटीची बैठक घेणे ही शोकांतिका आहे. सण-उत्सव वाहतूक एकात्मतेचा संदेश जाईल असेच वागा, असे प्रतिपादन भुसावळचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले. साकेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या सभेप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर कुंभार, उपसरपंच शकील पटेल, माजी सरपंच अनिल पाटील, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, पोलीस पाटील राजू सपकाळे, माजी कृउबा सभापती संजय पाटील, ग्रा.पं.सदस्य माणिक पाटील, सुरेश पाटील, विजय पाटील, धनराज भोई, साबीर पटेल, संतोष भोळे, प्रमोद पाटील, दिलीपसिंग पाटील, रमजान पटेल, महेंद्र कुंभार, सुभाष कोळी, वासेफ पटेल, राहुल चौधरी सुभाष कोळी, उपस्थित होते.
येणारा पोळा, मरिमाता यात्रोत्सव, गणेशोत्सव, दुर्गा देवी उत्सव सर्व सण एकोप्याने साजरे करा, कुणाच्याही भावना दुखवू नका. सन २०११ व २०१७ मध्ये पोळा सणाला गालबोट लागले होते. त्यामुळे युवकांवर प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा पद्धतीने वागू नका, असे ही राठोड यांनी सांगितले.
गाव आदर्श गावाच्या वाटेवर असून, गावात जणू छोटा भारतच समाविष्ट आहे. गावात ३३ जातीधर्माचे लोक गावात राहतात, हे नक्कीच गौरवास्पद बाब आहे. गावात सर्वच सण एखाद दुसरी घटना सोडल्यास गुण्या-गोविंदाने साजरी होतात. तसेच मुस्लीम समाजबांधवांची मशीद हिंदू बहुल भागात आहे हे याचे उत्तम उदाहरण आहे, अशी माहिती माजी सरपंच आनंदा ठाकरे यांनी दिली.
साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोंडे, सुरेश वैद्य, भीमदास हिरे, पो.हे.सुधाकर पाटील, पो.ना. विजय पोहेकर यांच्यासह सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोळा सणात भाग घेणारे युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.