कळस गाठल्यावर ‘पाया’चा विसर नकोच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:30 PM2018-12-02T12:30:45+5:302018-12-02T12:31:10+5:30
राजकीय क्षेत्रात स्वार्थी, संधीसाधू मंडळींचा बोलबाला असल्याने सत्ता कोणत्याही पक्षाची येवो, लाभ घेणारे, स्वत:चे भले करुन घेणारी ठराविक मंडळीच असते. पडत्या काळात पक्षाचा झेंडा प्रामाणिकपणे खांद्यावर घेणारा निष्ठावंत उपेक्षित राहतो. हे दुर्देव आहे.
मिलिंद कुलकर्णी
उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची संस्कृती राजकारणात झपाट्याने स्विकारली गेली. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे असे लंगडे समर्थन पराभूत पक्ष करीत असतो. कावळे सत्ता असताना येतात, कावकाव करुन पक्षात कोलाहल माजवतात, सत्तेचे लाभ उचलतात आणि वाऱ्याची दिशा ओळखून उडून जातात. मावळे तेथेच राहतात. त्यांचा दुर्गुण एकच असतो. ते पक्ष, नेता, विचार आणि तत्त्वावर निष्ठा ठेवतात. कळस गाठल्यानंतर तारतम्य ठेवून ‘पाया’ची आठवण ठेवणारे विरळ होत चालले आहेत.ही अधोगती म्हणायला हवी.
काँग्रेसची स्वातंत्र्यानंतर अनेकदा शकले उडाली.नावात कॉंग्रेस ठेवून नवे पक्ष स्थापन झाले. पण त्याचा कॉंग्रेसला फारसा फटका बसला नव्हता. काँग्रेसचा पराभव हा कॉंग्रेसचे नेतेच करतात, असे म्हणतात, तसेच घडले. सामान्य कार्यकर्त्याशी असलेली नाळ आणि ब्लॉक ते केंद्र असा ढाचा दूर सारुन दरबारी राजकारण सुरु झाल्यानंतर काँग्रेस विकलांग होत गेली. जळगाव जिल्हा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. भाजपामध्ये आता हेच सुरु आहे. ‘आयारामां’चे स्वागत आणि निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होत आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असे म्हणणारा वारकरी संप्रदाय हा महाराष्टÑाचा खरा आदर्श आहे. पाया आणि कळस अशा दोघांची आठवण ‘ग्यानबा-तुकाराम’ च्या गजराने वारकरी कायम ठेवत असतो, म्हणून हा संप्रदाय कायम वृध्दिंगत होत आहे. आषाढी आणि कार्तिकीला पंढरीच्या वाटेने जाणारे लाखो वारकरी हे रहस्य आधुनिक व्यवस्थापन तज्ज्ञांना, विचारवंतांना अजूनही उमगत नाहीये. या संप्रदायामधील सर्वसमावेशक वृत्ती, समान न्यायपध्दत, जातपात, भेद विरहीत वर्तन ही बलस्थाने आहेत.
पंढरपूरचा विठोबा आणि वारकरी संप्रदायाशी नाते सांगणारी अनेक मंडळी राजकारणात असतानाही महाराष्टÑातील राजकारणाची स्थिती आणि गती चिंता वाटावी, अशी झाली आहे. देश आणि राज्याचा विकास, समाजाचे भले, तरुणांच्या आयुष्याला दिशा, महिलांना निर्भय वातावरण, जगाच्या पोशिंद्याचा सन्मान हे विषय अजेंड्यावर हवे असताना आज कोणत्या विषयावर आम्ही भांडत आहोत. कुठे चालले आहे राजकारण? आमचे नेतृत्व करणाºया मंडळींमध्ये भविष्याचा वेध घेण्याची आणि त्यादृष्टीने नियोजन करण्याची क्षमता आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येईल.
केवळ सत्ताप्राप्ती एवढा एकमेव उद्देश ठेवून राजकीय पक्ष कार्यरत आहेत. सत्ताप्राप्तीसाठी बेफाम आश्वासने, नको त्या तडजोडी केल्या जात आहे. सत्ता तर आली, पण ती राबविणारी मंडळी मागच्या सरकारमधलीच असली तर कोणते धोरण, विचार बदलणार आहे. ‘ये रे माझ्या मागल्या’ असेच होणार आहे ना. गावपातळीपर्यंत ही सत्तापिपासू वृत्ती पोहोचली आहे. येनकेनप्रकारणे सत्ता हस्तगत केली जात आहे. स्वत:चे कोटकल्याण करा, जनतेचे होईल तेव्हा होईल, हीच मनोभूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता आहे. एका घटकाचे समाधान करीत नाही, तर ९९ लोकांनाही न्याय हवा असतो. अस्वस्थतेतून उद्रेकाची भावना तयार होते.
सर्वच राजकीय पक्षांमधील विचारी, अभ्यासू नेते, कार्यकर्ते अडगळीत गेले असून ‘इन्स्टंट’, स्मार्ट नेते कार्यकर्ते, उदयाला आले आहेत. कोणताही प्रश्न दोन मिनिटात सोडविण्याची हातोटी असल्याचा गवगवा केला जातो. पण तो तात्कालीक उपाय असतो, कायमस्वरुपी तोडगा नाही, हे लक्षात घेतले जात नाही. किंवा लक्षात आले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर मानले जात आहे.
राजकीय पक्षांमधील निष्ठावंत, अभ्यासू, जाणकार आणि बुजूर्ग नेते आणि कार्यकर्त्यांची सत्ता आल्यानंतर होणारी उपेक्षा हे पक्षाच्या वैचारिक अधोगतीचे एक कारण आहे. अगदी धुळ्याचे उदाहरण घ्यायचे तर तेथे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निष्ठावंत आणि आयाराम असा संघर्ष पेटला आहे. जो तो दुसºयाला परका आणि स्वत:ला निष्ठावंत म्हणत आहे. सगळ्यांकडे कोणती ना कोणती सत्ता आणि पदे आहेत, तरीही ते भांडत आहेत. आणि ज्यांनी कधी सत्ता, पदांसाठी लालसा धरली नाही, वर्षानुवर्षे निष्ठेने कार्य करीत राहिले ते लखन भतवाल, धरमचंद चोरडीया यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते मूकपणे हे सारे बघत आहेत. भाजपामधील या लाथाळ्यांनी ते उद्वीग्न आहेत. भामरे, रावल असो की गोटे हे सगळे इतर पक्षातून आलेली मंडळी आता निष्ठावंतांची भाषा बोलत आहेत. तीन वरुन पन्नासवर पोहोचायचे असेल तर ‘आयारामां’ना घ्यावेच लागेल, निवडणूक जिंकण्याची क्षमता या व्याख्येत बसणारे उमेदवार हवेच असे उघडपणे समर्थन केले जात आहे.
सत्ता येईल, पण या खिचडीतून अपेक्षित विकास साधता येईल काय? जळगाव जिल्हा परिषद, जळगाव महापालिका यात अशीच सत्ता आली, पण विकास का होत नाही. आपापसात हेवेदावे का सुरु आहेत, ते सोडविण्यासाठी सातत्याने नेत्यांना, मंत्र्यांना का लक्ष घालावे लागत आहे, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहेत, त्यांना निवडून आलेले सदस्य सांभाळायचे जिकीरीचे काम करावे लागत आहे. पण सत्तेत असताना ही मंडळीदेखील धुंदीत, जोशात होती. जनता सुज्ञ आणि समजूतदार आहे, ती वेळ आली की, फुग्यातील हवा काढतेच.
स्वबळाची कसोटी
२०१४ ची विधानसभा निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांची कसोटी पाहणारी ठरली. स्वबळावर निवडणूक लढविताना २८८ जागांवर उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागली. २०१९ मध्ये सगळेच पक्ष युती आणि आघाडीची भाषा बोलत आहेत. पुन्हा तीच परिस्थिती कोणाला नको आहे. युती तोडून भाजपाला फायदा झालेला असला तरी पुन्हा स्वबळावर लढण्याची जोखीम भाजपा पत्करत नाही, यात सगळे आले.