सात दिवसांपेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:42+5:302021-07-29T04:17:42+5:30
जळगाव : कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याकडे सात कार्यालयीन दिवसांपेक्षा अधिक काळ प्रकरणे प्रलंबित राहता कामा नये, यासह १६ विविध सूचना ...
जळगाव : कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याकडे सात कार्यालयीन दिवसांपेक्षा अधिक काळ प्रकरणे प्रलंबित राहता कामा नये, यासह १६ विविध सूचना देत कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पालन करावे, असे सक्त आदेश नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, याबाबत त्यांनी एक पत्रच काढले आहे, दरम्यान, शिस्तीचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
डॉ. पंकज आशिया यांनी नुकतेच बैठकीला गैरहजर विभागप्रमुखांना नोटिसा देऊन खुलासा मागविला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने सर्व कर्मचाऱ्यांना शिस्तीबाबत पत्र काढले आहे. यात शिस्तीचे पालन करण्यास हयगय झाल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुख यास जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांकडून शिस्तीचे तथा वेळेचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून, ही बाब गंभीर असल्याचे डॉ. आशिया यांनी म्हटले आहे.
या आहेत काही प्रमुख सूचना
वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांनी ९.४५ वाजताच कार्यालयात उपस्थित राहावे, अवकाश कालावधी व्यतिरिक्त कोणीही बाहेर आवारात गप्पा करताना किंवा चहाच्या टपरीवर दिसता कामा नये, कार्यालयीन वेळेत भ्रमणध्वनीचा उपयोग करू नये, तो सायलेंट ठेवावा, संगणकावर युट्युबू सोशल साईट्स पाहू नये, ओळखपत्र परिधान करावे, वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करावा अशा विविध १६ सूचना सीईओंनी दिल्या आहेत.
बैठक शांततेत
सोमवारी रद्द झालेली आढावा बैठक बुधवारी घेण्यात आली. यावेळी सर्व विभागप्रमुख वेळेवर उपस्थित होते. दरम्यान, गेल्या बैठकीला नोटिसा बजावण्यात आलेल्या विभागप्रमुखांनी अद्याप खुलासा सादर केला नसल्याची माहिती आहे. या बैठकीत नियमित आढावा घेण्यात आला.