आलेल्या रुग्णांना दाखल करण्यास नकार देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:48 AM2020-06-09T11:48:48+5:302020-06-09T11:49:07+5:30
जिल्हाधिकारी : जनआरोग्य योजनेतील रुग्णालयाच्या डॉक्टर्सना सक्त सूचना
जळगाव : महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी आलेल्या रुग्णांना दाखल करण्यास नकार देऊ नये, त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत उपचार व्हायला हवेत, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या आहेत.
महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालयांच्या डॉक्टरांसोबत जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दुपारी बैठक घेतली. त्यात या सूचना देण्यात आल्या. पंधरा मिनिट ही बैठक चालली़ शहरातील १० ते १२ तर बाहेरील काही डॉक्टर्सनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे या बैठकीस उपस्थिती दिली.
डॉ़ उल्हास पाटील रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाल्यानंतर या ३३ रुग्णालयांमध्ये अन्य रुग्णांवर मोफत उपचारांची सुविधा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे़ रुग्णसंख्या वाढतील तशा सुविधा अद्ययावत करून रुग्णालयांनी सज्ज राहावे, व्हेंटिलेटरसह सर्व सुविधा सज्ज ठेवा तक्रारी येऊ देऊ नका, अशा सूचना त्यांनी दिल्या़
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविडला आढावा
जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बैठक घेऊन सूचना दिल्या़ कर्मचारी कमी असतील तर त्यासाठी लवकर जाहीरात काढावी, आॅक्सीजन सिस्टीमचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, रुग्णांच्या तक्रारी येऊ देऊ नका, मृत्यूदर रोखण्यासंदर्भात सर्व उपाययोजना करा, अशा सूचना डॉ़ ढाकणे यांनी दिल्या़ जे़ जे़ रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ़ मधुकर गायकवाड यांनीही औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टरांची बैठक घेतेली.
दरम्यान, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात आता ४०० बेड उपलब्ध होणार आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत काही डॉक्टरांनी जनआरोग्य योजनेसाठी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी लागणारी सर्व कागदपत्रे अथवा रेशनकार्ड रुग्णांकडे नसल्यास ती जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रुममधून उपलब्ध होतील. तहसीलदारांनाही तशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.
प्राथमिक तपासणीची मागणी
अनेकांना लक्षणे नसतानाही रुग्ण कोरोना बाधित आढळून येत आहेत़ अशा स्थितीत किमान प्राथमिक तपासणी व्हावी, अशी मागणी काही डॉक्टरांकडून समोर आली़ दरम्यान, ही शंका दूर करण्यासाठी एक सॉफ्टवेअर असून त्यातून छातीच्या एक्सरेच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात माहिती मिळू शकते, हे मशीन शाहू महाराज रूग्णालयात दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे़ याचे सादरीकरण या बैठकीत झाले.
शाहू महाराज रुग्णालय आज सुरू होणार
शहरातील राजर्षी शाहू महाराज रुग्णालय तीन महिन्यांपासून क्वारंटाईन सेंटर असल्याने या ठिकाणचा सर्व स्टाफ रजेवर पाठविण्यात आला होता़ रविवारी आदेश आल्यानंतर या ठिकाणच्या क्वारंटाईन रुग्णांना हलविण्यात आले व त्यानंतर या ठिकाणी स्वच्छता करून पूर्ण डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ शाहू महाराज रूग्णालय मंगळवारी सुरू होणार असल्याची माहिती प्रकाश चौबे यांनी दिली़ या ठिकाणी सहा आयसीयूचे बेड व ७० अन्य बेड असून अत्यावश्यक सेवेच्या वेळी ५ ते दहा बेड वाढवता येतील, असेही त्यांनी सांगितले़ हे रुग्णालय पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून महात्मा ज्योतीबा फुले योजनेअंतर्गत सेवा उपलब्ध असल्याचेही चौबे यांनी सांगितले़
केंद्रीय आरोग्य सचिवांनी सोमवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत जिल्हाधिकाºयांकडून माहिती घेतली आणि त्यावर काय उपाय करता येईल, याबाबत माहितीपर विश्लेषण सादर केले. राज्यातील १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांशी सचिवांशी संपर्क साधला.
आज करणार पाहणी...मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे हे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. शाहू महाराज रुग्णालय बंद असल्याने गैरसोय होत ती आता थांबणार आहे. याठिकाणी विशेष करुन गरोदर महिलांसाठी सोय उपलब्ध करुन देण्यावर भर देणार असल्याचे डॉ. ढाकणे म्हणाले.