डॉक्टरांना गुन्हेगार समजून वागणूक देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:16 AM2020-06-06T11:16:59+5:302020-06-06T11:17:11+5:30

आयएमएच्या राज्या शाखेचे मुख्यमंत्र्यांना पत्र : कामे करणाऱ्यांना न्याय देण्याची केली मागणी

Do not treat doctors as criminals | डॉक्टरांना गुन्हेगार समजून वागणूक देऊ नका

डॉक्टरांना गुन्हेगार समजून वागणूक देऊ नका

Next

जळगाव : कोरोनाच्या काळात आयएमएचे डॉक्टर सेवा देत आहेत. त्यांना गुन्हेगार समजून वाईट वागणूक देऊ नका, लॉकडाऊनच्या काळात खासगी डॉक्टर्संनीही रुग्णांना इमाने इतबारे सेवा दिली आहे. असे असतानाही त्यांना वाईट वागणूक मिळत असेल तर ते दुर्दैवी आहे. या प्रकरणात आपण लक्ष घालावे, अशी मागणी करणारे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे.
जळगावात दोन दिवसापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. बैठकीत खाजगी डॉक्टरांना त्यांनी दवाखाने न उघडल्यास मेस्मा कायदा लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. या अनुषंगाने संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आयएमएचे डॉक्टर्स हे जळगाव विभागात दररोज जवळपास ५ हजारपेक्षा जास्त रुग्णांची देखभाल करतात. त्याचबरोबर सरासरी ६५० रुग्ण हे दररोज खासगी रुग्णालयात दाखल होतात. दररोज ६०० शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच भुसावळ विभागात आयएमएचे डॉक्टर्स १ हजारपेक्षा जास्त ओपीडी रुग्णांची देखभाल करतात. लॉकडाउनच्या काळात केवळ ५ टक्के दवाखाने व रुग्णालये ही बंद होती. कारण तेथील डॉक्टर्स हे ६० ते ६५ वर्षे वयाचे होते. तसेच काही हॉस्पिटलस् व दवाखाने ही कन्टेनमेंट झोनला लागूनच होती. हॉस्पिटलसाठी लागणारा कर्मचारीवर्गही लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नसल्यानेही काही ठिकाणी हॉस्पिटल्स बंद ठेवावी लागत होती.
आरोग्यमंत्र्यांनी जळगावला भेट दिल्यानंतर येथे वाढलेल्या मृत्यूदराचे खरे कारण हे येथील प्रशासकीय व्यवस्था आणि समन्वयाचा अभाव हे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एवढे सगळे असताना या बैठकीत आयएमएच्या सदस्यांना मिळालेली वागणूक ही वाईट होती.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत खाजगी डॉक्टरांना मेस्मा कायदा लागू करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर, आयएमएच्या भारतीय हॉस्पीटल बोर्डाचे चेअरमन डॉ. मंगेश पाटे यांच्या सह्या आहेत.

लॉकडाऊन काळातही सेवा देत आहोत तरीही आम्हाला नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला जातो. मात्र जे शासकीय डॉक्टर्स काम करीत नाही. त्यांच्यावर काहीच कारवाई का नाही? सेवा देण्याबाबत सरकारकडून आम्हाला कुठलीही गाईडलाईन आलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सचिव यांना पत्र पाठवूनही साधे उत्तरही देण्यात आलेले नाही.
- डॉ. अविनाश भोंडवे,
राज्याध्यक्ष, आयएमए, महाराष्टÑ.

आएएमएचे २५० डॉक्टर्स कोविडच्या रुग्णांना रोज सकाळ- संध्याकाळ तीन तीन तास सेवा देत आहेत. तरीही आम्हाला मेस्मा कायदा लागू करण्याची भाषा वापरली जाते. हे योग्य नाही.
- डॉ. दीपक पाटील,
अध्यक्ष, आयएमए. जळगाव.

Web Title: Do not treat doctors as criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.