बदल्याचा राजकारणापेक्षा, बदलाचे राजकारण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:15+5:302021-02-15T04:15:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी वेळ नाही अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी वेळ नाही अशा परिस्थितीत खडसेंच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी बदल्याचे राजकारण न ‘बदला’च्या राजकारणावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत खासदार उन्मेष पाटील यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यासाठी निवडणूक योग्य वेळ असते, तेव्हाच या आरोपांना महत्व दिले गेले पाहिजे असेही खासदार पाटील यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या अर्थ संकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी रविवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री असताना जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांना निधी मिळाला नाही असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपांबाबत खासदार उन्मेष पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शेळगाव बॅरेज, लोंढे-वरखेडे बॅरेजच्या कामासाठी निधी मिळाला हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याचा विकास करताना सर्वांनी सोबत येण्याची गरज आहे. यामध्ये ‘मी-तु’ करण्याची गरज नसल्याचा टोलाही खासदार पाटील यांनी खडसे यांना लगावला आहे.
अनधिकृत वाळू उपस्याबाबत कारवाई करावी
चाळीसगाव तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याचे सांगून वाळू माफियांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देत खासदार पाटील यांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असून, वाळू माफियांना कोणाचा वरदहस्त नसल्याचेही म्हटले आहे.
नैतिकता ठेवून प्रवेश करायचा होता - आमदार भोळे
भुसावळातील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना पळवाटा शोधल्या आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करताना नगरसेवकांनी नैतिकता दाखवून पक्षाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीत प्रवेश करायचा होता. मात्र, त्यांनी नैतिकता दाखविली नसल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी सांगितले. वर्षभरातच निवडणूका असून, या निवडणुकामध्ये जनताच यांना उत्तर देईल असे आमदार भोळे यांनी सांगितले. काही जण पक्ष सोडून गेले असले तरी इतर जण देखील भाजपात आले आहेत.