सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:11 PM2018-08-29T16:11:13+5:302018-08-29T16:12:06+5:30
अमळनेर येथे व्याख्यानात असिस्टंट प्रोफेसर डॉ.विवेक बोरसे यांची माहिती
अमळनेर, जि.जळगाव : सध्या कॅन्सर ही खूप मोठी समस्या आहे. त्यावरील उपचार सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीला परवडत नाही. काही जण खर्चाच्या भीतीने त्यावर उपचार करणेही टाळतात. गरीबातील गरीब माणसाला परवडेल असे संशोधन भविष्यात करायचे आहे, त्यासाठी शासनाकडून नव्वद लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, असे प्रतिपादन आयआयटी गुवाहाटी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून निवड झालेले डॉ.विवेक बोरसे यांनी केले.
येथील प्रताप महाविद्यालय अमळनेर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या ज्योती राणे यांनी डॉ.विवेक बोरसे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रताप महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन डॉ.बोरसे यांनी जे यश संपादन केले आहे ते आमच्यासाठी खूप आभिमानस्पद आहे. सामान्यज्ञान, विशेषज्ञान संशोधनविषयक ज्ञान व व्यावहारिक ज्ञान याचा उत्कृष्ट संगम असेल तर जीवनात उतुंग करिअर करता येते, असे मत उपप्राचार्य प्रा.एस.ओ.माळी यांनी व्यक्त केले. या वेळी डॉ.बोरसे यांचे वडील भास्कर बोरसे, प्रा.वारुळे, प्रा.भुतडा, प्रा.गुलाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.बोरसे पुढे म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवले की,, आत्मविश्वास निर्माण होत जातो आणि यश आपोआप मिळत जाते. आईवडील, शिक्षक, प्राध्यापक, मित्र, नातेवाईक यांच्यापासून खूप प्रेरणा मिळाली. बारावीनंतर आपले आवडीचे क्षेत्र निवडा, जे क्षेत्र निवडाल त्याच्यात जीव ओतून काम करा, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. आयआयटी पवईमध्ये बेस्ट पीएचडी थिसिस अवॉर्ड मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला. शासनातर्फे इंस्पायर फॅकल्टी पुरस्कार मिळाला. यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचे हे फळ आहे. प्रताप महाविद्यालयात शिकलो आणि याच महाविद्यालयात माझा सन्मान झाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. यातून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक आव्हानांवर मात करायची आहे, सर्वांचे आशीर्वाद आहेत, यश नक्की मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. शेकडो विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. उपप्राचार्य पी.आर.भावसार यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक पी. बी.अग्रवाल यांनी आभार मानले.