Shivsena: आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता?, गुलाबरावांनी सांगितला तो प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 01:06 PM2022-07-24T13:06:13+5:302022-07-24T13:09:03+5:30
गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
जळगाव - आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकीचा राजीनामा देण्याची गरजच नाही. आम्ही शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असून, त्यासाठी दिवसरात्र झटून पुढेही काम करत राहू. मात्र, पक्षप्रमुखांनी जे आधी करायला हवे होते ते आता करीत आहेत. उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर भाष्य केलं. तसेच, ते गुवाहाटीला जाताना घडलेला प्रसंगही त्यांनी सांगितला.
गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. युवा सेनेच्या तालुका व जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यानंतर, त्यांनी लोकमतशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यकर्ते नेत्यांचं ऐकत असताना, मग नेत्यांनीही कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. मला व्यक्तिगत अडचण नव्हती. पण, पहिल्या वेळेस निवडून आलेल्या आमदारांची मोठी खदखद होत होती. मी तर मातोश्रीवरच होतो, मी 34 वा आमदार आहे तिकडे जाणारा. मी त्यावेळी संजय राऊतांना सांगितलं की, अजूनही वेळ गेलेले नाही, त्यांना बोलवा. तर, ते म्हणाले तुम्हालाही जायचं असेल तर जावा... असे राऊत म्हणाले. 4 लाख लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही हलकटसारखं निघून जायला सांगता, असं राजकारण मला वाटत नाही कुठे असेल, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
आम्हीही विचार केला की, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, आम्ही मंत्रीपद सोडून बाहेर निघालो. आज लोकं सरपंचपद सोडत नाहीत, पण आम्ही मंत्रीपद सोडून निघालो, यावरुन तीव्रता तुमच्या लक्षात येईल. आता लढाई ना तुमच्या हातात ना आमच्या हातात, आता लढाई निवडणूक आयोगाच्या हातात आहे. आता, ते सांगतिल ते, असेही गुलाबरावा पाटील यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरेंनी हेच काम आधी करायचं होतं
आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दोन दिवस जिल्ह्यातच, पुढे पहाच
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नसल्याने अनेकांसोबत चर्चा करता आलेली नाही; मात्र आता दोन दिवस जिल्ह्यातच थांबणार असल्याने अनेकांसोबत चर्चा करायच्या आहेत. तसेच येत्या काळात त्याबाबतचे चित्र दिसेलच असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.