पहूर रुग्णालयाला डॉक्टर देता का, डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:55 AM2019-12-15T00:55:56+5:302019-12-15T00:57:18+5:30
तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे.
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : नागरिकांना आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. मात्र पहूर ग्रामीण रुग्णालय याला अपवाद ठरले आहे. तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
पहूर ग्रामीण रूग्णालय राष्ट्रीय महामार्गावर आहे. दररोज शंभर ते दोनशे रुग्णांना रुग्णसेवा याठिकाणी मिळत आली आहे. मात्र २० आॅक्टोबरपासून तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी कारणावरून राजीनामा दिला आहे. या रिक्त जागांवर आरोग्य प्रशासनाला तब्बल दीड महिन्यांपासून डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे रुग्णसेवा ठप्प आहे. नागरिकांना आरोग्य सेवा देणे शासनाला बंधनकारक आहे, असे दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेच्या पाहणी दरम्यान सांगितले. पण शासनाला दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरीही वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे पहूर रुग्णालयाच्या रूग्णसेवेवरून समोर आले आहे. याविषयी पहूरकर जनतेला आरोग्याच्या मूलभूत हक्कासाठी एकदिवस रस्त्यावर उतरून जनतेच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जाण्याची वाट पाहात आहेत का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.