जळगाव जिल्ह्याशी संबधित या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:10 PM2017-12-28T17:10:16+5:302017-12-28T17:26:32+5:30
महाभारत आणि रामायण काळाचे संदर्भ मिळतात मध्ययुगीन कालखंडात
विलास बारी / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२८ : कापूस, केळी व सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. रामायण आणि महाभारतकाळातील घटना आणि घडामोडी जळगाव जिल्ह्याशी संबधित आढळून आलेल्या आहेत. श्री क्षेत्र पद्मालय येथे भीमाने बकासूराचा वध केला होता. तर प्रभु रामाने बाण मारून उनपदेव व सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे निर्माण केले. राजा दशरथाने श्रावण बाळाच्या हत्येचे परिमार्जन पूर्वीच्या एदलाबादजवळील पवित्र तलावात केल्याचे संदर्भ मिळून आले आहेत.
आताचा खान्देश इतिहासकालिन असीरगड
प्राचीन काळी हा प्रदेश निर्जन होता. असीरगडजवळ थोडी मानवी वसाहत होती. या वसाहतीचा संबध महाभारत महाकाव्यातील द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा याच्याशी होता. महाभारत काळात तोरणमाळचा एक राजा पांडवांच्या बाजूने लढला असे म्हटले जाते. या महाकाव्यातील एकचक्रनगरी म्हणजे सध्याचे एरंडोल असे स्थानिक अभ्यासक सांगतात. भीमाने बकासुराचा वध पद्मालयजवळ केला होता. अबुल फजल ज्याला अदिलाबाद म्हणतो ते एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) हे चांगले नगर होते. राजा दशरथाने श्रावण बाळाची हत्या करून जे महापातक केले होते. त्याचे परिमार्जन दशरथाने एदलाबादजवळील पवित्र तलावात केले. या तलावात बारमाही पाणी असून १६ व्या शतकापासून शेतीसाठी जलसिंचन करण्यात येते.
३०० परगणे असलेल्या खान्देशची राजधानी होती बºहाणपूर
इतिहासकार बर्निअरने लिहून ठेवल्यानुसार खान्देशात ३०० परगणे अस्तित्वात होते. बºहाणपूर ही खान्देशची राजधानी होती. खान्देशातील सुभ्याचा एकुण महसूल त्यावेळी १८ लाख ५५ हजार रुपये होता. मुघलकालिन हिंदुस्थानच्या नकाशामध्ये जळगाव व भुसावळचा उल्लेख नाही. मात्र अमळनेर, बहाळ, भडगाव, पाचोरा, शेंदुर्णी, लोहारा, एरंडोल, धरणगाव, अडावद, चोपडा, डांभूर्णी, नशिराबाद, यावल, सावदा, न्हावी, चांगदेव, वरणगाव, बोदवड, एदलाबाद, अंतुर्ली, रावेर, बहादरपूर, जामनेर, जामोद, जैनाबाद या गावांचा उल्लेख सापडतो.
गिरीपर्णाची झाली गिरणानदी
मालेगाव तालुक्यातील वजिरखेडे येथे उत्खननात सापडलेल्या दोन ताम्रपटांमध्ये गिरणा नदीचा उल्लेख गिरीपर्णा असा आढळतो. या ताम्रपटाचा लेखनकाल इ.स.९१५ मानला जातो. ताम्रपटवरील संस्कृत प्रशस्तीचा लेखक कवी राजेश्वर आहे. गिरीपर्णाचा अपभ्रंश होऊन नदीला गिरणा नाव पडले असावे.
खान्देश होती कापडांची बाजारपेठ
इ.स.१६५६ पासून १७१७ पर्यंत मुघल राजवटीत जबाबदारीची व मानाचे स्थान भूषविणारा व्हेनिसचा निकोलाव मनुची अनेक वेळा खान्देश भ्रमंतीवर आला. त्याने समक्ष पाहिलेल्या घटनांच्या आठवणी चार ग्रंथांच्या रुपाने लिहून ठेवल्या. बºहाणपूरला उत्तम कापड, महिलांचे दुपट्टे व बुरखे तयार होत असल्याने पर्शियन व आर्मेनियन व्यापारी वारंवार खरेदीसाठी येत होते. याठिकाणी पांढरे व रंगीत तलम कापड आणि रंगीत छापील कापड तयार करण्यात येई. बरेच कापड पर्सिया, टर्की व अरबस्तानला निर्यात होत असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.