जप्त केलेला माल ठेवण्यासाठी जागा देता का जागा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:57+5:302021-03-17T04:16:57+5:30
जळगाव : अन्न व औषध विभागामार्फत अवैध गुटखा पकडला जातो, मात्र हा जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी या विभागाकडे ...
जळगाव : अन्न व औषध विभागामार्फत अवैध गुटखा पकडला जातो, मात्र हा जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी या विभागाकडे जागाच नसल्याने ‘जागा देता का जागा’ अशी म्हणण्याची वेळ या विभागावर आलेली आहे. मोठ्या उत्साहात या विभागाकडून अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाया केल्या जातात, मात्र हा उत्साह तेवढ्यापुरताच मर्यादीत राहतो. महापालिकेच्या मालकीच्या आंबेडकर मार्केटमध्ये या विभागाचे कार्यालय भाड्याच्या जागेत आहे. स्वत:च्या मालकीचेही कार्यालय या विभागाला मिळालेले नाही.
गुटखा, मावा यासह अवैध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुध्द अन्न व औषध विभागाकडून कारवाया केल्या जातात, त्याशिवाय हॉटेल, ढाबे यासह इतर खाद्य पदार्थ तयार करणारे फर्म, आस्थापना असोत किंवा विक्री करणारे यांच्याकडील अन्नाचे नमुने घेऊन ते खाण्यास योग्य आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाते. हे नमुने प्रयोग शाळेत पाठविले जातात. दरम्यान, या विभागाकडे जप्त केलेला माल साठविण्यासाठी जागेची वाणवा आहे, तशीच मनुष्यबळाची वाणवा आहे.
त्याशिवाय सरकारी वाहन देखील नाही. एखाद्या तालुका पातळीवर किंवा ग्रामीण भागात गुटखा किंवा अन्य कोणच्या अवैध खाद्य पदार्थाचा साठा पकडला तर तो माल आणण्यासाठी भाड्यानेच वाहन शोधावे लागते. वाहन, हमाल वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याही पुढे गेल्यानंतर हा माल साठविण्यासाठी गोदाम किंवा भाड्याची जागाही नाही. त्यामुळे कार्यालयच गोदाम झालेले आहे. दरम्यान, साठविलेला माल हा सहायक आयुक्तांच्या परवानगीने मनपाच्या डम्पीग ग्राऊंडमध्ये नष्ट केला जातो.
अन्न व औषध प्रशासनाच्या २०२०मध्ये केलेल्या कारवाया
जानेवारी -१
फेब्रुवारी -२
मार्च -०
एप्रिल -४
मे -३
जून -१
जुलै -१
ऑगस्ट -०
सप्टेंबर -१
ऑक्टोबर -०
नोव्हेंबर -०
डिसेंबर -१
वर्षभरात जप्त केला ३९ लाखाचा गुटखा
अन्न व औषध प्रशासन विभागाने जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यात जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुध्द १४ कारवाया केल्या. त्यात सर्वाधिक ११ कारवाया या लॉकडाऊन काळातच झालेल्या आहेत. या काळात ३६ लाख ६४ हजार ६५२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. वर्षभरात एकूण ३९ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. विक्रेत्यांविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
जप्त साठा ठेवण्यासाठी जागा नाही
अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सध्या आंबेडकर मार्केटमध्ये मनपाच्या व्यापारी संकुलात भाड्याने आहे. याच कार्यालयात जप्त केलेला गुटखा ठेवला जातो, त्याशिवाय रद्दी व इतर अनावश्यक साहित्यही याच कार्यालयात ठेवले जात असल्याने धुळ व दुर्गंधीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयासाठी सरकारी जागा मायादेवी नगरात उपलब्ध करुन देण्यात आली आहे, मात्र शासनाकडून पुढे काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे केव्हा तेथे इमारत तयार होईल, हे सांगणे अवघडच आहे. सरकारी काम अन् सहा महिने थांब अशी स्थिती या विभागाची झालेली आहे.
--