कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:28+5:302021-07-30T04:16:28+5:30
१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट (डमी ९८३) लोकमत न्यूज ...
१ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा : गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० हजार शेतकऱ्यांची घट
(डमी ९८३)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातची पिकेदेखील वाया गेली होती. मात्र, नुकसानभरपाईच्या मदतीपासून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला होता. त्यामुळे यावर्षी खरीप पीकविमा योजनेंतर्गत काढण्यात येणाऱ्या विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, तर यावर्षी १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. या योजनेत लाभ मिळणे कठीण झाले असून, केवळ पीकविमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
कोट..
जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. अद्याप बँकेंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. ती संख्या आल्यास संख्या पुन्हा वाढलेली दिसून येईल.
-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक
४० हजार शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
१. जिल्ह्यात भारतीय एक्सा इन्शुरन्स कंपनीला खरीप पीक विम्याचा तीन वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगर कर्जदार असलेल्या १ लाख ६३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला होता. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता.
२. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे काही अंशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील १ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम भरली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण संख्येत ४० हजार शेतकऱ्यांची घट झाली आहे. २०१९ मध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता.
जिल्ह्यातील एकूण शेतकरी १२ लाख
गेल्यावर्षी - १ लाख ६६ हजार ४९९
यावर्षी - १ लाख १९ हजार ३८८
एकूण खरीप क्षेत्र - ७ लाख २२ हजार हेक्टर
तालुकानिहाय विमाधारक
अमळनेर - ३१ हजार ७८९
चोपडा - १४ हजार ००३
जामनेर - १९ हजार ९९४
जळगाव - ३ हजार १९८
पारोळा - १८ हजार २३४
धरणगाव - ९ हजार ४६९
कोट
खरीप पीकविमा योजनेंतर्गत आम्ही जवळजवळ सर्वच पिकांचा विमा काढला होता. झालेले नुकसानदेखील मोठे होते. मात्र, गेल्यावर्षी आम्हाला नुकसानभरपाई मिळालीच नाही. यामुळे यंदा खरीप हंगामाचा विमा काढलेला नाही. काढूनदेखील पैसे वाया गेलेच असते. त्यापेक्षा विमा काढलेलाच न बरा.
-पंकज संभाजी पाटील, शेतकरी
गेल्यावर्षी विमा काढूनदेखील आम्हाला नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. पिकांचे नुकसान झाले. त्यात लावलेल्या खर्चाइतके उत्पन्नदेखील आम्हाला झाले नाही. यावर्षी विमा काढायचा का नाही? हा प्रश्न आमच्यासमोर होता. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव पाहता विमा न काढलेलाच बरा. असा शेतकऱ्यांचा कमी, विमा कंपन्यांचाच यामध्ये फायदा होत असतो.
-संजय सुभाष पाटील, शेतकरी