‘वाचवाऽ वाचवाऽऽ’ टाहो फोडूनही डाॅक्टरनी दाखल केले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:05 PM2021-04-13T23:05:28+5:302021-04-13T23:07:13+5:30
मला वाचवा, मला वाचवा-मला श्वास घ्यायला त्रास होत आहे,’ अशी गयावया चोपडा येथील एक रुग्ण पोटचा मुलगा आणि सुनेसमोर करीत होता. पण...
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : ‘अहो, मला कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करा. मला वाचवा, मला वाचवा-मला श्वास घ्यायला त्रास होत आहे,’ अशी गयावया चोपडा येथील एक रुग्ण पोटचा मुलगा आणि सुनेसमोर करीत होता. मुलगा आणि सून जळगाव शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी चार तास वाहनातून फिरत असताना एकही डॉक्टरांनी रुग्णास दाखल केले नाही. अक्षरशः राजकीय स्त्रोत वापरूनही मंत्री, आमदार, खासदार यांनी भ्रमणध्वनीवर डॉक्टरांना संपर्क करूनही रुग्णास दाखल केले नाही. त्यामुळे कोरोनाबरोबरच माणुसकीहीनता किती वाढली आहे, याचेच प्रत्यंतर आले आहे.
चोपडा येथील जयप्रकाश माधवराव पाटील (६५) या रुग्णास दाखल करण्यासाठी त्यांच्या मुलास आलेल्या अनुभवाची व्यथा मांडताना त्यांना गहिवरून आले.
रुग्ण जयप्रकाश पाटील यांचे व्याही व चोपडा पंचायत समितीचे सदस्य, पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी डोळ्यात आसवं आणून सांगितले की, आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींची अशी गत आणि अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? आणि केवळ मंत्री, आमदार, खासदार यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोन करूनही केवळ आपल्याला शासकीय दरानुसार बिल घ्यावे लागेल. या भीतीपोटी गयावया करणाऱ्या रुग्णाससुद्धा जळगाव शहरांमधील जवळपास पन्नास हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. रुग्ण जेव्हा मला वाचवा, मला वाचवा अशा गयावया करीत होता, त्या वेळेस मन गहिवरून येत होते. परंतु इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती जर रुग्णास दाखल करून घेण्याच्याबाबतीत असेल तर राजकारण कशासाठी आणि कोणासाठी करायचे? असा प्रश्नही त्यांनी निर्माण केलेला आहे.
रुग्णाच्या बाबतीत माहिती देताना एम. व्ही. पाटील म्हणाले की, चोपडा येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये व्याही व रुग्ण जयप्रकाश माधवराव पाटील यांनी सहा दिवस उपचार घेऊन तब्येत ठीक झाल्यानंतर घरी गेले होते. घरी गेल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर त्यांना पुन्हा श्वासाचा त्रास व्हायला लागला. म्हणून चैतन्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक दिवस दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्ण नॉन कोविड असल्यामुळे तेथून बाहेर काढण्यात आले आणि खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा चार ते पाच दिवस दाखल ठेवण्यात आले. त्यानंतर या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी मात्र पॉझिटिव्ह आल्याने या हॉस्पिटलमधूनही नंतर बाहेर काढून कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असे सांगण्यात आले.
पुन्हा तेथून रुग्णाला सोमवारी ॲम्बुलन्समध्ये टाकले. तेथून सहयोग हॉस्पिटलमध्ये ठेवले. सहयोग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही आमचे हॉस्पिटल ही कोविड हॉस्पिटल नसल्याने तुम्ही रुग्णास कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, असा सल्ला दिला. त्यानंतर पुन्हा रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले आणि जवळपास जळगाव शहरामध्ये सर्व पन्नास हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या गयावया करून रुग्णास चार तास फिरूनही एकाही डॉक्टरने रुग्णास दाखल करून घेण्यास संमती दर्शवली नाही. बोलताना त्याचे कारण जाणवले की राजकीय लोकांचा रुग्ण असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे बिल मिळणार नाही, म्हणून रुग्णास दाखल करून घेण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला.
रुग्णाचा ऑक्सिजनचा स्तर हा ६०पर्यंत खाली आलेला होता आणि घरी परत घेऊन जाताना वाटेवर असलेल्या एका जळगाव शहरातीलच एका हॉस्पिटलमध्ये या रुग्णास जे होईल, ते होईल, या भरोशावर दाखल करण्यात आले आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने डॉक्टर सेवाभाव जोपासतात का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे.
सगळेच मार्ग संपले अन् हिंमत सोडली..
या चार तासाच्या कालावधीमध्ये रुग्ण मात्र पोटच्या मुलाकडे ‘मला वाचवा रे, मला वाचवा रे, मला ॲडमिट करा’, अशी गयावया करीत असताना पोरगा, सून आणि व्याही यांचे मन गहिवरून आले. आपणही काही करू शकत नसल्याने व सर्व व्हीआयपी सोर्सेस वापरून झाल्याने काहीही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी कोविड रुग्णांच्या संदर्भात तयार केलेल्या पथकाकडे गयावया केली. पथकाकडूनही एकाही हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितल्याने हिंमत सोडली.
राजकारण कशासाठी? आणि जीवन जगावे तरी कशासाठी?
मंत्री, खासदार आणि आमदार यांचे भ्रमणध्वनी करूनही आणि स्वतः राजकारणात सक्रिय असल्यानंतर जर रुग्णास दाखल करून घेतले जात नसेल तर राजकारण कशासाठी करावे आणि जीवनही कशासाठी जगावे? असा सवाल पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती एम. व्ही. पाटील यांनी असा हताश होऊन केला आहे.