गळ्यात अडकलेली डबी डॉक्टरांनी अलगद काढून बालकाला दिले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 03:09 PM2020-08-29T15:09:27+5:302020-08-29T15:12:14+5:30
मुक्ताईनगर , जि.जळगाव : १० महिने वयाच्या विराटच्या गळ्यात वेदनाशामक मलम (बाम) प्लॅस्टिक डबी अडकल्याने श्वसन नलिका दाबली जाऊन ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : १० महिने वयाच्या विराटच्या गळ्यात वेदनाशामक मलम (बाम) प्लॅस्टिक डबी अडकल्याने श्वसन नलिका दाबली जाऊन अत्यवस्थ झालेल्या बालकाला शहरातील हृदयरोग व नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांनी जीवदान दिले.
विराट बबन रायपुरे, रा.भांनगुरा, ता.मुक्ताईनगर या अवघ्या १० महिने वयाच्या बालकाने शनिवारी सकाळी साडेआठला अंथरूणावर खेळता खेळता जवळ पडलेली वेदनाशामक बामची प्लॅस्टिकची डबी तोंडात घातली आणि ती गळ्यात जाऊन अडकली.
विराटच्या वयाच्या हिशोबाने अन्ननलिका बारीक आणि प्लॅस्टिकची डबी आकारात मोठी यामुळे डबी अन्ननलिकेच्या तोंडावर, तर श्वसन नलिकेच्या बाजूने जाऊन अडकली. बालकाच्या रडण्यामुळे डबी अधिक आत ओढली गेली आणि श्वसन नलिका दाबली जाऊन विराट अत्यवस्थ होऊ लागला. अशा परिस्थितीत त्याला डॉ.एन.जी.मराठे यांच्याकडे आणण्यात आले. श्वास कमी झाल्याने तो निळा पडू लागला. डॉक्टरांनी मोठ्या शिताफीने प्रसंगावधान राखत लहानग्या विराटच्या गळ्यातून प्लॅस्टिकची डबी काढली आणि विराटने मोकळा श्वास घेतला.
थोडाही वेळ अधिक वाया गेला असता तर श्वास थांबून विराटने जीव गमावला असता. वेळेवर डॉक्टर देव म्हणून सापडले आणि डॉक्टरांच्या साक्षात देवरूपाने विराटला जीवदान मिळाले, अशी भावना या विराटच्या मातेने व्यक्त केली.
भेदरलेल्या अवस्थेत असलेली त्याची आई आणि आजी सोबत मामाने विराटच्या गळ्यातून डबी काढली गेली आणि त्याने आवाज काढला. हे पाहून आनंदअश्रूंना वाट मोकळी करून दिली. डॉक्टरांचे साक्षात देव म्हणून त्यांनी आभार मानले.