डॉक्टरांचा कडकडीत बंद
By admin | Published: March 24, 2017 12:28 AM2017-03-24T00:28:53+5:302017-03-24T00:28:53+5:30
आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जळगाव : डॉक्टर व रुग्णालयांवर होणारे हल्ले थांबावेत व त्यांच्या सुरक्षेविषयीच्या मागण्या मान्य होत नसल्याने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होत जिल्ह्यातील डॉक्टरांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदचा हा दुसरा दिवस होता. यामध्ये जिल्ह्यातील १५०० डॉक्टर सहभागी होत ११०० रुग्णालय आज बंद होते. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले.
औषधी दुकानेही दुपारपर्यंत बंद असल्याने रुग्ण ताटकळले होते. या बंदला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, गुरुवारी या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) बैठक होऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये डॉक्टरांसह केमिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय प्रतिनिधीही सहभागी होणार आहे.
धुळे येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पुन्हा मुंबई येथे डॉक्टरांवर हल्ला झाला. या घटनेमुळे राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. मात्र सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने व डॉक्टरांवर हल्ले सुरूच असल्याने या बंदमध्ये आयएमएदेखील सहभागी झाली असून बुधवार दुपारपासून जिल्ह्यातील रुग्णालये बंद ठेवण्यात आले आहे.
अनेक रुग्ण माघारी परतले
रुग्णालय बंद असल्याचे पाहून नाईलाजास्तव अनेक रुग्ण लगेच माघारी परत होते. एका अत्यवस्थ असलेल्या रुग्णास खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले मात्र बंद असल्याने रुग्णावर उपचार होवू शकले नाहीत. त्यामुळे रात्री साडे नऊ वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही उपचार न झाल्याने मुंबई येथे तातडीने हलविण्यात आले.
या बंदमध्ये ओपीडी, शस्त्रक्रिया बंद असल्याने आलेल्या गंभीर रुग्णाला केवळ अत्यावश्यक सेवा म्हणून प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता.
बंदमुळे जिल्हा रुग्णालयात अधिक रुग्ण येण्याची शक्यता होती. मात्र जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या नियमित होती.
आयएमएच्या बैठक़ीत संप यशस्वी करण्याचा निर्धाऱ़ बंद संदर्भात गुरुवारी आयएमएची बैठक झाली. यामध्ये हा संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ. प्रताप जाधव, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हाभरातील डॉक्टर उपस्थित होते.
आज सकाळी ११ वाजता मोचाऱ़़़् डॉक्टरांच्या मागण्या मान्य होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ व म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयएमएच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आयएमए सभागृहापासून मोर्चास सुरुवात होईल.
गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर उपचार
रुग्णालये बंद असल्याने तर काही रुग्णांवर प्रथमोपचार करून दुसरीकडे पाठविले जात असल्याने अनेक रुग्ण गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पोहचले. त्यामुळे सोनोग्राफी, एमआरआय, एक्स-रे करणाºया रुग्णांची संख्या अधिक होती. प्रसूतीसाठी अनेक महिला दाखल झाल्या. त्यामुळे रुग्णांना तेवढा दिलासा मिळाला. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढणार असल्याच्या शक्यतेने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन सज्ज असून वाढीव उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच रजेवर असलेल्या डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.