कोरोना काळात डॉक्टरांचे वजन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:24+5:302021-05-25T04:18:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात सर्वांत पहिल्या फळीत लढणारी यंत्रणा म्हणजे डॉक्टर होय, गेल्या दोन लाटांमध्ये वैद्यकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात सर्वांत पहिल्या फळीत लढणारी यंत्रणा म्हणजे डॉक्टर होय, गेल्या दोन लाटांमध्ये वैद्यकीय क्षेत्राची खरी कसोटी लागली असून, यात शासकीय यंत्रणेतील डॉक्टरांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला आहे. त्यातच अनेक डॉक्टरांचे वजन घटले तर आहेत, काहींनी ते घटविले आहे. अनेकांना आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही, मात्र, तरही आहारावर विशेष लक्ष केंद्रित करून प्रतिकारक्षमता योग्य राहील याबाबत दक्ष असल्याचे डॉक्टर सांगतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे एप्रिल २०२० पासून पूर्णत: कोविड हॉस्पिटल झाले आहे. या ठिकाणचे डॉक्टर या वर्षभरात पूर्णत: कोविड रुग्णांच्या सातत्याने संपर्कात आहेत. पहिल्या लाटेत अनेक डॉक्टर बाधित झाले हाेते. दुसऱ्या लाटेतही अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यातून बाहेर पडून सर्व डॉक्टर पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. रुग्णाची प्रकृती सुधारण्यासाठी दिवसभर धावपळ, या कक्षातून त्या कक्षात सातत्याने संपर्क, रुग्णांवर विशेष लक्ष याबाबींमुळे दिवसभराचा वेळ कधी निघून जातो हे कळतही नाही, अशा प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिल्या आहेत.
-------
जिल्हा रुग्णालय : १
डॉक्टरांची संख्या १४०
आरोग्य कर्मचारी जिल्ह्यात : २२००
--------
दिवसांतून पाच ते सात राउंड पूर्ण कक्षांचे होतात. सातत्याने रुग्णांचे मॉनिटरिंग होत असते, धावपळ तर आहेत, त्यात आम्ही वैयक्तिक पातळीवर मास्क परिधान करणे, रुग्णांशी संपर्क येत असल्यास पीपीई किट परिधान करणे सॅनिटायझेशन करणे, नियमित जेवण व्यवस्थित करणे, या गोष्टींचे पालन करतो. गेल्या वर्षभरापासून डॉक्टरांची मेहनत असून, जीएमसीचा रिकव्हरी रेट वाढणे हे समाधानकारक आहे.
- डॉ. इम्रान पठाण, विभागप्रमुख दंत शल्य चिकित्साशास्त्र
------
सर्वच डॉक्टर या कोरोना काळात धावपळ करून रुग्णसेवा देत आहे. डॉक्टरांच्या प्रकृतीवर साहजिकच परिणाम झाला आहे. मात्र, त्यातच प्रतिकारक्षमता वाढविणारा आहार यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यात लिंबू वर्गीय फळे, हळदीचे दूध, अंडे, प्रोटिनयुक्त आहार अशा पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने प्रतिकारक्षमता उत्तम राहते. त्यातच व्यायामाकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असते. त्यामुळे शारीरिक व मानसिक दोनही प्रकारचे त्रास कमी होतात.
- डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख, औषधवैद्यक शास्त्र विभाग
रुग्णांच्या बेडचे नियोजन करणे ही मध्यंतरी खरी कसोटी होती. त्यात सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सेवा देण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. रुग्णसेवा करीत असताना स्वत:ची प्रकृती सांभाळणे हे डॉक्टरांसाठी खरी परीक्षा असते, कारण डॉक्टर आजारी पडले तर उपचार कोण करणार म्हणून याेग्य आहार, प्रोटिनयुक्त आहार, यात महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रतिकारक्षमता वाढविणारी पदार्थ याचे सेवन अधिक करतो, तणावापासून दूर राहणे हा प्रकृती उत्तम ठेवण्याचा एक मार्ग आहे.
सतीश सुरडकर
कनिष्ठ निवासी डॉक्टर