डॉक्टरांनी उपचार नाकारला, दवाखाने फिरण्यातच वायरमनचा जीव गेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:47 PM2020-07-05T12:47:24+5:302020-07-05T12:47:56+5:30
कोरोनाचा असाही फटका
जळगाव : वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या तोडताना फांदीचा वीज तारांना स्पर्श होऊन त्याचा झटका मुक्तार कादर शेख (३५, रा.तांबापुरा, जळगाव) या कंत्राटी वायरमनला लागल्याने ते झाडावरून थेट जमिनवर कोसळले. या प्रकारानंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जखमी अवस्थेत त्यांना रिक्षातून शहरात दोन दवाखाने फिरविले. डॉक्टरांनी उपचार नाकारल्याने फिरण्यातच मुक्तारचा जीव गेला.
ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता इच्छादेवी चौक परिसरातील सिध्दीविनायक हॉस्पिटलनजीक घडली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. मुक्तार यांना वेळीच उपचार मिळाला असता तर त्यांचा जीव वाचला असता असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख मुक्ता हे महावितरणमध्ये सहा वर्षापासून कंत्राटी पध्दतीने वायरमनचे काम करायचे. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास इच्छादेवी चौकानजीकच्या सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या मागे असलेल्या ११ केव्हीए डीपीवरील असलेले झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी ११ केव्हीए डीपी बंद होती. त्याच डीपीच्या ११ फुट अंतरावर ३३ केव्हीए वीज क्षमतेची डीपी आहे.
दरम्यान, झाडाची फांदी तोडताना ती ३३ केव्हीएच्या तारावर पडली. त्यामुळे मुक्तार यांना जोरदार धक्का लागल्याने ते जमिनीवर कोसळले. सहकारी कर्मचाºयांनी तातडीने शेजारील रफिक शेख या रिक्षा चालकाला बोलावले. त्याच्या रिक्षातून मुक्तार याला तातडीने बहिणाबाई उद्यानाजवळील एका दवाखान्यान नेले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाला आतमध्ये न घेताच बाहेरुन दुसºया दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रिक्षात त्यांचा श्वास सुरू होता तर इतर जण छातीवर दाब देत होते. तेथून बी. जे. मार्केट परिसरातील दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रिक्षा परत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आली. तेथे १२.१७ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ.भोळे यांनी मुक्तार यांना मृत घोषित केले. १० ते १२.१७ म्हणजे सव्वा दोन तास दवाखाने फिरण्यात गेले. वेळीच उपचार झाले असते तर मुक्तार यांचा जीव गेला नसता असे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार रतिलाल पवार यांनी पंचनामा केला.मुक्तार यांच्या पश्चात पत्नी मीनाजबी, मुलगा रब्बीऊल व उमर तसेच आठ भाऊ असा परिवार आहे.
मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा
या घटनेला महावितरण जबाबदार असून मुक्तार यांच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईक व महाराष्टÑ बाह्यस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेने घेतला. कार्यकारी अभियंता संजय तडवी यांनी रुग्णालयात येऊन नातेवाईक व संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेतली. मुक्तार हे कंत्राटी कामगार असल्याने नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मात्र त्यावर नातेवाईक व संघटनेचे समाधान झाले नाही. महावितरणनेदेखील जबाबदारी घ्यावी अशी मागणी होऊ लागली होती. मदतीच्या आश्वासनानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
दोषींवर कारवाई करा : संघटना
महाराष्टÑ बाह्यस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेने अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वीज तारांचा स्पर्श होऊन कामगारांच्या मृत्यू घटना पाहता कंत्राटी तंत्रज्ञ व कामगारांना जिवंत प्रवाह असणाºया वाहिनीवर काम करण्याचे निर्देश देऊ नयेत याबाबत १८ मे २०१० रोजी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देण्यात आले होते, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले.वीज वाहिनीवर काम करण्यास नकार दिला तर कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्याचाच आजचाही बळी आहे, अस संघटनेने म्हटले आहे.