शाळा न उघडल्याने दोधेचे मुख्याध्यापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:09+5:302021-02-20T04:44:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिवसभर शाळा न उघडणारे दोधे ता. रावेर येथील मुख्याध्यापक किशोर श्रावण चौधरी व शिक्षक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवसभर शाळा न उघडणारे दोधे ता. रावेर येथील मुख्याध्यापक किशोर श्रावण चौधरी व शिक्षक भूषण शांताराम सोनवणे या दोघांवर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. शाळांच्या पाहणीसाठी दुपारी पथक पाठविल्यानंतर ही शाळा बंद असल्याचे निदर्शनास आले. विशेष बाब म्हणजे सीईओंनी स्वत: न जाता गुप्त पद्धतीने हे पथक शाळांवर पाठविले होते.
यासह मोरझिरी ता. मुक्ताईनगर येथील दांडी बहाद्दर तीन शिक्षकांना नोटीसा बजावून त्यांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश डॉ. पाटील यांनी दिले आहे. तसेच जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित नसल्याने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गुरुवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास ही पाहणी करून कारवाई करण्यात आली आहे.
यांना नोटीसा
मोरझिरी येथील शिक्षक नंदकिशोर पांडुरंग कदम, गोकूळ बापू देवरे, रुपाली कृष्णा धनगर हे शाळेत गैरहजर होते. पथकाने पाहणी करून ही माहिती सीईओंना देताच त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून वेतनवाढ थांबविण्यात आली आहे. तर शिक्षण विभागातील परिचर उर्मिला खर्चे, विजया महाजन, वरिष्ठ सहाय्यक अनिल सपकाळे, प्रतिभा चौधरी, जितेंद्र सोनवणे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या विभागात उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
विभाग प्रमुखांनाही दणका
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार हे मुंबई येथील बैठक आटोपून दुसऱ्या दिवशी दांडी मारल्याने सीईओंनी या दोन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा मागितला आहे. मुंबई येथे एसटी समितीसमोर सुनावणी हाेती. दोन दिवस ही सुनावणी होती. गुरूवारी सर्व अधिकारी परतणे अपेक्षित होते. मात्र, हे दोन अधिकारी कर्तव्यावर नसल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.