कुणी जळगावला येतं का जळगावला? महसुल अधिकाऱ्यांची ‘ना’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:13 PM2023-04-16T15:13:38+5:302023-04-16T15:15:02+5:30
तीन पदे रिक्त, दोन दिवसात निघणार पुन्हा बदल्यांचे आदेश
कुंदन पाटील, जळगाव: राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले. या बदल्या करताना जळगाव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांना ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले. तर जळगावच्या महसुल प्रशासनात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह तीन जागांवर अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत.दरम्यान, जळगावातील राजकीय आणि प्रशासकीय गोंधळाविषयी ऐकून निवासी उपजिल्हाधिकारी पदावर येण्यास अनेकांनी नकार दिला आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्त झालेले संजय गायकवाडही जळगाव येण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे.
९ उपजिल्हाधिकारी व ८ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याजागी अद्याप नियुक्ती नाही. धुळ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. त्यानुसार सुनील सुर्यवंशी यांनी तत्काळ पदभार सोडला होता. मात्र गायकवाड अद्याप रुजू झालेले नाहीत. तर सुर्यंवशी हेदेखिल नियुक्तीच्या प्रतिक्षेतच आहेत. तसेच निवडणुक शाखेतील तहसीलदार हंसराज पाटील यांचीही बदली झाली आहे. त्यांनीही पदभार सोडला असून त्यांच्याजागी मात्र अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी हेदेखिल नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
नवे ‘आरडीसी’ कोण?
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची नगरला निवडणुक शाखेत बदली झाली. त्यांनीही पदभार सोडला. मात्र या महत्त्वाच्या पदावरही नियुक्ती झालेली नाही. माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती होणार आहे. मात्र अनेक अधिकारी जळगावी यायला तयार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.
तिघांच्या बदल्या
धुळ्यातील रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल प्रशासनाची धुरा देण्यात आली आहे.नाशिकचे गणेश मिसाळ यांना नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून तर श्रीरामपूर (अहमदनगर) प्रांताधिकारी अनील पवार यांची नियोजन विभागाच्या अपर मुख्य सचीव मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी मात्र अजुनही नियुक्तीच्या प्रतिक्षेतच आहेत.तसेच एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी यांनदेखिल नियुक्ती मिळालेली नाही.
दोन दिवसात बदल्या
दरम्यान, रिक्त जागांसह प्रतिक्षेत असणाऱ्या तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या अधिकाऱ्यांमध्ये चाळीसगाव, पाचोरा प्रांताधिकारी तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.