कुणी लस देता का लस?...खासगी, सरकारी सर्वच केंद्रांवर लसींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:05+5:302021-07-25T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा असून नागरिकांना लस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा असून नागरिकांना लस मिळत नसल्याने खाली हात परतावे लागत आहे. यात खासगी व शासकीय दोन्ही केंद्रांवर अगदीच मुबलक साठा शिल्लक असल्याने आता कुणी लस देत का लस अशी म्हणायची नागरिकांवर वेळ आली आहे.
मध्यंतरी शासकीय केंद्रांवर कमी मात्र, खासगी केंद्रांवर अधिक साठा असल्याने खासगी केंद्रांवर लस घेणाऱ्यांची संख्या वाढत होती. मात्र, आता त्या ठिकाणीही कमी साठा असल्याने नागरिकांना कोणत्याच केंद्रावर लस मिळत नसल्याचे गंभीर स्थिती आहे. जिल्हाभरात लसीकरणासाठी ३५० पेक्षा अधिक केंद्र असताना लसींचा मुबलक साठाच नसल्याने नागरिकांना आता लसीकरणासाठी पुन्हा तासन्तास थांबावे लागत आहेत. त्यातच अनेकांना अद्यापही पहिल्या डोसचीच प्रतीक्षा असल्याने नेमकी जनता सुरक्षित होणार कशी असा प्रश्न समोर आला आहे.
१८ ते ४५ वयोगट
पहिला डोस : १५५६३७
दुसरा डोस : १३२५१
४६ ते ५९ वयोगटात
पहिला डोस : २२९०८४
दुसरा डोस : ४९६७१
६० वर्षांवरील नागरिक
पहिला डोस : २१२६१०
दुसरा डोस : ७४५५२
शासकीय रुग्णालयात शिल्लक साठा : ३५००
खासगी केंद्रांवरील शिल्लक साठा : ७५०
१ मध्यंतरी जिल्ह्यातील चार खासगी केंद्रांवर शुल्क आकारून लस दिली जात होती. मात्र, या केंद्रांनाही लसीचा पुरेसा साठा मिळत नसल्याने आता केवळ जळगावातील एकाच खासगी केंद्रांवर लसीचे ७५० डोस शिल्लक आहेत.
२ अगदी सुरुवातीला केवळ कोव्हॅक्सिन लसच खासगी केंद्रांना उपलब्ध झाली होती. नंतर कोविशिल्ड काही प्रमाणात उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, ती आता उपलब्ध होत नसल्याने ही केंद्र बंदच आहेत.
चार वेळा गेलो परत
गावात केवळ ५० डोस असतात, आम्हाला गावात लस मिळत नाही. म्हणून आम्ही जळगावातील केंद्रांवर आलो मात्र, या ठिकाणी ५० टक्के ऑफलाइन सांगूनही आम्हाला दिवसभर थांबूनही लस मिळत नाही. आम्ही चार वेळा परत गेलो. शनिवारी पुन्हा लसीसाठी सकाळी सहा वाजेपासून आलो. मात्र, लस मिळत नाहीय- निर्मलाबाई ज्ञानेश्वर अस्वार, शिरसोली
केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन आहे. मात्र, शासनस्तरावरून लसीकरणाचा साठा कमी होत आहे. आपण आपल्या पातळीवर मागणी नोंदवित असतो, मात्र, सर्वत्रच लसीचा तुटवडा आहे. आपल्याकडे वेस्टेजचे प्रमाण शून्य असून आपण अधिक लसीकरण केले आहे. - डॉ. समाधान वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी