जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का?, सर्वसामान्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:36 PM2018-01-02T12:36:57+5:302018-01-02T12:39:51+5:30
बैठक रद्द होवून उलटले 14 दिवस
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 02- उत्तर महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात मुख्यमंत्री बैठक केव्हा घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान स्वत: मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय आमदारांना 18 डिसेंबर ही जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती मात्र ऐनवेळी ती रद्द केल्याने व अजूनही ती न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, विदर्भ तसेच मराठवाडा आदी भागातील प्रश्न ज्या प्रमाणे सुटतात, त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय होते. या भावनेतून अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या भागातील मंत्री व आमदार अशा 35 जणांच्या गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत रोष व्यक्त केला होता.
उत्तर महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून त्या प्रश्नांची दखल घेत ते प्रश्नही सोडविण्यात यावे, अशी मागणी या आमदारांनी केली होती. यानंतर या भागालाही योग्य न्याय देण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. त्यानुसार 18 रोजी जळगाव जिल्ह्याची बैठक घेतली जाणार होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अन्य काम निघाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली तसेच विविध समस्यांचा आढावा प्रथमत: जिल्हाधिकारी घेतील असेही सांगण्यात आले. बैठकीची पुढील तारीख लवकरच कळविली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र सुरुवातीस आयोजित केल्यानुसार या बैठकीची तारीख उलटून जवळपास 14 दिवस झाले तरीही ही अद्यार्पयत ही बैठक होवू शकलेली नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांना उत्तर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी वेळ नाही का? असा सवालही सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
आठवडाभरात बैठक - गिरीश महाजन
मागील काही दिवस अधिवेशनाच्या गडबडीत गेले. मुख्यमंत्री हे स्वत: उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नी गंभीर असून जवळपास आठवडाभरात याबाबत जिल्ह्याची बैठक होवू शकते, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पाठपुरावा करु - गुलाबराव पाटील
अधिवेशन आटोपल्यावर मंत्रालयाच्या कामकाजास ख:या अर्थाने 1 तारखेपासून सुरुवात झाली आहे. 2 रोजी मंत्रीमंडळाची बैठक असून उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या बैठकी संदर्भात मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळवा म्हणून आपण पाठपुरावा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
लवकर वेळ काढावा - डॉ. सतीश पाटील
जिल्ह्यात खूपच प्रश्न प्रलंबित आहेत. दोन वर्षापासून काहीच कामे झाली नाहीत. यामुळे जनतेत मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. या बाबीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेत लवकरात लवकर वेळ काढून विविध प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.