शिक्षण विभागाकडे इतर संस्थाची माहिती आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:35+5:302021-02-10T04:16:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोथरूड पोलिसांच्या पथकाने मराठा विद्याप्रसारक मंडळाची माहिती मागितल्यानंतर यातील काही महत्त्वाची माहिती सापडत नसल्याबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोथरूड पोलिसांच्या पथकाने मराठा विद्याप्रसारक मंडळाची माहिती मागितल्यानंतर यातील काही महत्त्वाची माहिती सापडत नसल्याबाबत शिक्षण विभागानेच पोलिसांना पत्र दिले आहे. एका संस्थेबाबत माहिती मागितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अन्य संस्थांबाबतची जुनी माहिती विभागाकडे आहे की नाही, असा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
मविप्र बाबत कोथरूड पोलिसांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती मागितली होती. यात जी माहिती उपलब्ध होती ती देण्यात आली. मात्र, २०१२, २०१५ या प्रशासक आणि संचालक मंडळाच्या कार्यकाळात बदल्या, बढती, यासह महत्त्वाची माहिती नसल्याचे पत्र शिक्षण विभागाने पोलिसांना दिले आहे. हे पत्र व माहिती घेऊन पथक परतले असून आता यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, आम्ही ते रेकॉर्ड शोधत आहोत. २०१५ चे हे रेकॉर्ड रेकॉर्ड रुममध्ये शोधावे लागेल असे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी सांगितले. जर शैक्षणिक संस्थांबाबत शिक्षण विभागात माहिती उपलब्ध होत नसेल तर हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे मत शिक्षणक्षेत्रातून उमटत आहे. शिवाय माहिती मिळत नाही की गहाळ झाली, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.