रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का? आधी कोरोना टेस्ट करून घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:00+5:302021-07-07T04:19:00+5:30
सचिन देव जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात ...
सचिन देव
जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या आरटीपीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले आहे. तरच संबंधित प्रवाशाला त्यांच्या राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनी, आधी कोरोनाची टेस्ट करावी लागणार आहे.
दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. त्यानुसार आतापासूनच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा सरकारने ३० जूनपासून रेल्वेने कर्नाटक राज्यात येणाऱ्या प्रवाशासांठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले आहे. इतकेच नव्हे, तर कर्नाटक राज्याने कोरोना लसीकरणाचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्रही सोबत आणणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रक काढून, कर्नाटकातील कुठल्याही स्टेशनवर उतरण्यापूर्वी त्या ठिकाणी आरटीपीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट व लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नेण्याचे आवाहन केले आहे.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
हावडा एक्सप्रेस
काशी एक्सप्रेस
सेवाग्राम एक्सप्रेस
विदर्भ एक्सप्रेस
गितांजली एक्सप्रेस
कुशीनगर एक्सप्रेस
कामायनी एक्सप्रेस
इन्फो :
या रेल्वे कधी सुरू होणार :
हुतात्मा एक्सप्रेस
शालीमार एक्सप्रेस
इन्फो :
पॅसेंजर कधी सुरू होणार :
- अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे अमृतसर एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, खान्देश एक्सप्रेस या गाड्या नियमित सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळली आहे. मात्र, भुसावळ विभागातील गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या विविध मार्गावरच्या पॅसेंजर अद्यापही सुरू न केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. पॅसेंजर कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांमधुन उपस्थित केला जात आहे.
- पॅंसेजर सुरू होण्याबाबत `लोकमत` प्रतिनिधीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी रेल्वे बोर्डाकडून पॅसेंजर सुरू करण्याचे जेव्हा आदेश येतील, तेव्हाच पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोना टेस्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र आवश्यकच :
देशभरात आतापर्यंत कोरोनाची सर्वांधिक रूग्ण संख्या ही महाराष्ट्रात आढळून आल्यामुळे, इतर राज्यांनी महाराष्ट्रातून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला खबरदारी म्हणून आरटीपीसीआर चाचणी करून, तिचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले आहे.
इन्फो :
मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेना आरक्षण मिळेना
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने गेल्या महिन्यापासून सर्वत्र अनलॉक केला आहे.त्यामुळे व्यापार व उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यामुळे पर राज्यातील नागरिकांची मुंबई-पुण्याकडे जाण्यासाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे परप्रातांतून येणाऱ्या हावडा एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस व गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांना स्थानिक प्रवाशांना आरक्षण तिकीट मिळणे अवघड झाले आहे. आरक्षण मिळत नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
इन्फो :
खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारसह इतर राज्यातील सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट व कोरोना लस घेतली असेल तर त्याचे प्रमाणपत्रही सोबत आणणे आवश्यक केले आहे. त्यानुसार प्रवाशांनी या नियमांचे पालन केले तरच त्यांना संबंधित राज्यात प्रवेश मिळणार आहे.
युवराज पाटील, सिनिअर डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग