श्वान दंशाचे इंजेक्शन नसल्याचे सांगत गंभीर जखमी मुलाला घरी पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:39+5:302021-05-24T04:15:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका ९ वर्षीय मुलाच्या कानाचे कुत्र्याने लचके तोडल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक ...

The dog sent the seriously injured boy home, saying there was no injection of the bite | श्वान दंशाचे इंजेक्शन नसल्याचे सांगत गंभीर जखमी मुलाला घरी पाठविले

श्वान दंशाचे इंजेक्शन नसल्याचे सांगत गंभीर जखमी मुलाला घरी पाठविले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका ९ वर्षीय मुलाच्या कानाचे कुत्र्याने लचके तोडल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करीत घरी पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डाॅ. उल्हास पाटील रुग्णालय व जीएमसी रुग्णालयात शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत गंभीर जखमी अवस्थेतील या मुलाला घेऊन श्वान दंशाच्या इंजेक्शनसाठी फिरफिर केली. मात्र कुणीही दादपुकार घेतली नाही. दुसऱ्या दिवशी एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी फोन केल्यानंतर अधिष्ठात्यांनी पुढाकार घेत या मुलावर उपचार सुरू केले आहे.

कळमसरा ता. पाचोरा येथील रहिवासी असलेला यश महेंद्र सोनवणे (वय ९) हा सायंकाळी अंगणात खेळत असताना अचानक एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढविला. कुत्र्याने त्याच्या डाव्या कानाचा अक्षरश: लचका तोडला. हा प्रकार त्याची आजी तुळसाबाई यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यशला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. मात्र, तोपर्यंत कुत्र्याने त्याच्या कानाचा लचका तोडल्याने गंभीर दुखापत झाली होती.

पाच तास उपचारासाठी विनवण्या

यश सोनवणे याचे वडील महेंद्र सोनवणे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मुलाला झालेल्या गंभीर दुखापतीने ते हादरले होते. त्यांनी लागलीच डॉ. उल्हास पाटील रुग्णालय गाठले. या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावर जायला सांगितले. मुलाला हातावर घेऊन तशा परिस्थितीत ते वरती गेले. पुन्हा त्यांना खाली डॉक्टरांना भेटायला सांगण्यात आले. अशा फेऱ्या झाल्यानंतर तिथे मुलाच्या कानाला आठ ते दहा टाके मारून अखेर रात्री ८ वाजता आमच्याकडे इंजेक्शन नाही, असे सांगत तुम्ही मुलाला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर महेंद्र सोनवणे हे मुलाला तसेच घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. मात्र, या ठिकाणीही सुरुवातीला इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. त्या परिस्थितीत रात्री ११ वाजता मुलाला विना इंजेक्शन तसेच घेऊन ते घरी परतले.

दुसऱ्या दिवशी अधिष्ठात्यांचा पुढाकार

मुलाची प्रकृती बघून महेंद्र सोनवणे यांनी काही राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे मुलावर उपचार करण्याची मागणी केली. त्यानंतर अधिष्ठात्यांनी रविवारी दुपारी २ वाजता आपत्कालीन कक्षात या मुलाला जीएमसीत दाखल केले. या ठिकाणी तातडीने आवश्यक ते उपचार झाले. बालरोगतज्ज्ञांनी येऊन तपासणी केली.

वडिलांच्या डोळ्यात अश्रू

कुत्र्याने गंभीर चावा घेतल्यानंतर उपचारासाठी झालेल्या फिरफिरमुळे मुलावर उपचार करण्यासाठी बराच अवधी गेला. यात मुलाला ताप आला, त्यामुळे डॉक्टरांनी आता ताप उतरल्यावर इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितले. ही माहिती देत असताना वडील महेंद्र सोनवणे यांच्या डाेळ्यात अश्रू होते. गरिबांचे कोणी ऐकत नाही, इतकी मोठमोठी रुग्णालये आणि त्यात इंजेक्शन ठेवले जात नाही, हे शक्य आहे का? केवळ गरिबांना फिरवायचे, गरिबांनी जायचे कोठे, अशी व्यथा मुलाची आजी तुळसाबाई यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: The dog sent the seriously injured boy home, saying there was no injection of the bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.