कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:30 PM2018-10-26T13:30:57+5:302018-10-26T13:32:18+5:30

चालढकल करणे योग्य नाही

Dogs rise on the life of Jalgaon. | कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

Next

विकास पाटील
मोकाट कुत्रे जळगावकरांच्या जिवावर उठले आहेत. दररोज ते अबालवृद्धांचे लचके तोडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत असताना केवळ चालढकल केली जात असल्याने शहरवासी नाराज आहेत.
जळगावात २१ आॅक्टोबर रोजी गोपाळपुरा भागात एका सात वर्षांच्या बालकावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. याचवेळी त्या बालकाची बहिणही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली. या घटनेनंतर शहर व परिसरात याच दिवशी आणखी इतर तीन बालकांना कुत्र्यांनी लक्ष्य बनविले. दररोज कुत्रे हल्ले करीत आहे.
जळगाव शहरात कदापी कुणालाही सहज विश्वास बसणार नाही मात्र ५ हजार मोकाट कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात हिंडत असतात. रात्रीच्यावेळी तर भर रस्त्यावर ते ठिय्या मांडतात व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा व पादचाºयांचा पाठलाग करतात. त्यामुळे रात्रपाळीची नोकरी करणारे त्रस्त आहेत.
गेल्या नऊ महिन्यात कुत्र्यांनी साधारणत: साडेचार हजार नागरिकांना चावा घेतला व त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. ही फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारी आहे. काही रुग्ण खाजगी रुग्णालयातही उपचार घेतात, त्यांची नोंद नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही, हे विशेष. गोपाळपुºयातील घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या आरोग्य विभागाची बैठक घेवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदनगर पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी डॉग रुम तयार केली आहे. तशीच रुम तयार करुन निर्बीजीकरण करण्याचे ठरविले आहे. एका कुत्र्यावर एक हजार रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महासभेत निर्णय होईल, त्यानंतर पुढे प्रक्रिया सुरु होईल अन् कुत्र्यांचे चावे थांबतील. मात्र तोपर्यंत काय?
मनपाकडे डॉग व्हॅन आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून शहरापासून सोडण्याचे काम या वाहनाद्वारे होत असे. मात्र आता हे वाहन कुठे आहे? हे महापालिकेलाच माहित. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करणे आवश्यक आहे. मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावे. याबाबतीत चालढकल करणे योग्य नाही.
यापूर्वीही शहरात एकाच दिवशी १० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडूनकुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले मात्र उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नाराजी आहे. प्रशासन जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Dogs rise on the life of Jalgaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.