बोंडअळीला रोखण्यासाठी घरगुती हॅलोजन सापळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 12:33 PM2018-08-04T12:33:17+5:302018-08-04T12:33:36+5:30
कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळीमुळे शेतक-यांमध्ये मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे.
- अर्पण लोढा ।
जामनेर (जि. जळगाव) : कपाशीवर पडणाऱ्या बोंडअळीमुळे शेतक-यांमध्ये मोठीच चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या शेतांमध्ये तीव्र क्षमतेचे हॅलोजन सापळा लावून बोंडअळीचे पतंगच नाहीसे करण्याचा उपाय वाकोद ता. जामनेर येथील शेतक-यांनी शोधून काढला आहे. जामनेर आणि परिसरात कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. या मे महिन्यात लागवड झालेला कापूस सध्या पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर सद्यास्थितीमध्ये रस शोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. याशिवाय पूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. एवढेच नाही तर जिनींगमध्ये देखील बोंडअळीचे पतंग आढळत आहेत. पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत असणाºया कपाशीवर बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या हंगामात फरदडमुळे अनेक शेतकºयांनी बोंडअळीग्रस्त कपाशी देखील शेतात ठेवली होती. मागील हंगामामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासूनच झाला होता. त्यामुळे या हंगामामध्ये या किडीसाठी सजग राहणे आवश्यक आहे. ही अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर तिला रोखणे कठीण होते. त्यामुळे अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत बोंडअळीला रोखणे गरजेचे बनले आहे.
असा आहे घरगुती जुगाड
बोंडअळीमुळे गेल्या हंगामात निम्मे उत्पन्न घटल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यावर शेतकºयांकडून आतापासून उपाय केले जात आहेत. बोंडअळीचे पतंग किंवा अंडी शेतात असल्यास शेतात ठिकठिकाणी ट्रॅप लावले जात आहेत. यामुळे फक्त पिकावर अळीचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे समजते. जामनेर तालुक्याच्या काही भागात शेतक-यांनी बोंडअळीच्या पतंगानाच आहे त्याच ठिकाणी रोखण्याचा उपाय सुरु केला आहे.
असा आहे उपाय -
एक पत्र्याचा डबा घेवून त्याला पिवळा रंग लावायचा. या डब्यात दोन हजार वॅटचा हॅलोजन बल्ब (फोकस) शेतातील एका खांबावर लावावा. रात्रभर हा हॅलोजन सुरु ठेवायचा. यामुळे बोंडअळीचे पतंग दिव्याकडे आकर्षित होतात आणि दिव्याच्या उष्णतेने तेथेच मरून पडतात. हा उपाय सध्या परिसरात अनेक शेतकरी करीत आहेत.