जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:58 PM2021-11-23T13:58:19+5:302021-11-23T14:01:38+5:30
भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते.
जळगाव/धुळे: जिल्हा बँकेच्या २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. ११ जागा माघारीनंतर बिनविरोध झाल्या होत्या. भुसावळच्या जागेव्यतिरिक्त ९ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, श्यामकांत सोनवणे, मेहताबसिंग नाईक, शैलजा निकम व ॲड. रोहिणी खडसे विजयी झाले. रावेर सोसायटी गटातून माजी आमदार अरुण पाटील यांचा अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव झाला. जाहीर माघार घेतलेल्या जनाबाई महाजन (२६ मते) विजयी झाल्या. आहेत. भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे विजयी झाले. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वपक्षीय शेतकरी पॅनलने १३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळविले.
लातूरमध्ये देशमुख यांचा बोलबाला
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सहकार पॅनलमधील १८ उमेदवार विजयी झाले. १० जण यापूर्वीच बिनविरोध आले. १९ जागांपैकी केवळ एक जागा चिठ्ठीवर विरोधकांना मिळाली.