दोंडाईचा येथे आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न - पर्यटन मंत्र्यांनीच दाखविली चित्रफित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:25 PM2018-02-21T17:25:25+5:302018-02-21T17:30:55+5:30
पाच वर्षीय पीडित बालिकेची जळगावात विचारपूस
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २१ - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पीडीत पाच वर्षीय बालिकेच्या आई-वडिलांची बुधवारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन बालिकेची विचारपूस केली. या वेळी जळगावसह दोंडाईचा व इतर ठिकाणच्या विविध महिला संघटनांसह इतर संघटनांच्या पदाधिकाºयांनी रावल यांची भेट घेऊन शिक्षण व्यवस्था व एकूणच यंत्रणेबाबत रोष व्यक्त केला. महिलांच्या प्रश्नांना उत्तर देताना दोंडाईचा येथेच आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट रावल यांनी करीत पिडीत मुलगी व तिच्या वडिलांची चित्रफितच दाखविली.
दोंडाईचा येथील शाळेत ५ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने तिला शाळेच्या मागील बाजूस नेवून अत्याचार केल्याची घटना ८ रोजी घडली होती. या पीडित चिमुकलीला उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची विचारपूस करून कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार अमोल निकम, नगरसेवक सुनील माळी, माजी नगरसेवक भगत बालाणी, आदींसह विविध सामाजिक संघटना व महिला संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित शाळेची मान्यता रद्द करा - महिलांची एकमुखी मागणी
संबंधित शाळेमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने व या शाळेबाबत तक्रारी वाढत असल्याने या शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या वेळी महिलांनी केली. या सोबतच अल्पवयीन मुलींना शारीरिक बदल आणि व्यक्तींची ओळख देणे, स्वसंरक्षण कसे करावे याबाबत मुलींना शाळेत प्रशिक्षण द्यायला हवे, शिक्षणमंत्र्यांनी तसा नियम करावा, अत्याचार झालेल्या संस्थेची मान्यता रद्द करावी, मनोधैर्य योजनेत अल्पवयीन मुलींना तात्काळ मदत मिळावी, पीडित बालिकेसाठी रुग्णालयात वेगळ््या कक्षाची सोय करावी, अशा मागण्या महिला संघटनेच्या पदाधिकाºयांनी रावल यांच्याकडे केल्या. या शाळेत कोणत्याही सुविधा नसताना या शाळेला मान्यता कशी मिळाली, असा सवाल या वेळी महिलांनी उपस्थित केला.
आरोपीस ओळखणारी शिक्षिकाही फरार
शाळेत चिमुकली डबा खात असताना तो व्यक्ती तिला घेऊन जात होता, त्यावेळी तिने आरडाओरडही केला. परंतु कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही, अत्याचार करणारा तिच्याच परिसरातील असून घटनेनंतर एका शिक्षिकेने त्याला रागावले होते. सध्या ती शिक्षिकादेखील फरार असल्याचे या वेळी उपस्थित नातेवाईक व महिलांनी रावल यांच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वीदेखील अनेक घटना शाळेतच दडपल्या असतील, असा आरोप करून शाळेला संरक्षक भिंत नाही, सुरक्षारक्षक नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नाही, अत्याचार घडूनही शाळा सुरूच असल्याने पीडितेचे नातेवाईक व महिला संघटनांनी रोष व्यक्त केला.
आणखी एका पीडीत मुलगी व पित्याची चित्रफित
या पूर्वी १५ जानेवारी रोजी दोंडाईचा येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. तिने स्वत:ची सुटका करून पळ काढल्याने ती बचावली. परंतु नंतर त्या मुलीच्या पालकांवर दबाब आणण्यात आल्याने ते प्रकरण दडपण्यात आले. याप्रकरणी पीडीत मुलीने दिलेला जबाब, तिच्या पालकांचे म्हणणे असलेली चित्रफित खुद्द रावल यांनी उपस्थित महिलांना व त्यानंतर पत्रकारांनाही दाखवली. या मुलीच्या पित्याला धमकी दिली जात असल्याने तो पोलिसांकडे तक्रार देण्यास नाही म्हणत असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले, मात्र सुमोटो म्हणून कारवाई केली जाईल, असेही रावल म्हणाले.
संस्था चालकांच्या पुतण्याची दडपशाही
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रतीक महाले हा संस्थाचालक हेमंत देशमुख यांचा पुतण्या असून त्याची शाळेत मोठी दहशत असल्याचा दावा जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या पूर्वी याच प्रतीक महाले याने शाळेतील एका शिक्षिकेच्या मुलीचे अपहरण करून लग्न केले व या धक्याने मुलीच्या वडिलांचे निधन झाले, असेही रावल म्हणाले. वडिलांचे उत्तरकार्य होण्यापूर्वीच पटेल याने शिक्षिकेला धमकी देत मुलगी माझ्या ताब्यात द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा दम भरला होता, असे रावल यांनी सांगितले. त्यामुळे या शिक्षिकेने दोंडाईचा शहर सोडून ती आता शहादा येथे राहायला गेल्याचा दावा रावल यांनी केला. या सोबतच दोंडाईचा प्रकरणातीलच आरोपी नंदू सोनवणे यानेदेखील एका कार्यकर्त्याच्या मुलीला पळवून नेले व त्याच्या दहशतीमुळे त्या व्यक्तीलादेखील शहर सोडावे लागले, असे रावल म्हणाले. या वेळी उपस्थित काही पालकांनीही या शाळेबद्दल रोष व्यक्त केला.