म्युकरमायकोसिसला घाबरू नका, काळजी घ्या, उपचाराने बरा होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:19 AM2021-05-25T04:19:04+5:302021-05-25T04:19:04+5:30
जामनेर : कोरोना झालेल्या व्यक्तीमध्ये अधिक प्रमाणात रक्तातील साखर वाढणे, एड्स बाधित, स्टेरॉईडचा अधिक वापर, कर्करुग्ण वा इतर कोणत्याही ...
जामनेर : कोरोना झालेल्या व्यक्तीमध्ये अधिक प्रमाणात रक्तातील साखर वाढणे, एड्स बाधित, स्टेरॉईडचा अधिक वापर, कर्करुग्ण वा इतर कोणत्याही कारणाने प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा त्रास अधिक प्रमाणात होतो म्हणून या रुग्णांची संख्या सध्या वाढलेली दिसून येत आहे. या आजाराबाबत घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.
म्युकरमायकोसिस म्हणजे ‘काळी बुरशी’ हा आजार नवीन निर्माण झालेला नाही. घाबरून न जाता लवकर निदान आणि वेळेत उपचार केल्यास म्युकरमायकोसिस प्रभावीपणे बरा होतो.
आपल्या दैनंदिन जीवनात ब्रेड, शिळी पोळी किंवा भाकरी यावर जी काळी बुरशी असते, त्याचप्रमाणे हा बुरशीचा प्रकार आहे. ही बुरशी हवा, माती इत्यादी ठिकाणी असते व पूर्वीपासूनच ती वातावरणात आहे. आता कोरोना काळातच ती निर्माण झाली असे नाही. यापूर्वी ही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत होते परंतु याचे प्रमाण हे अत्यल्प होते.
कोरोना झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स, स्टेरॉईड यांचा अधिक वापर तसेच तणाव इत्यादीचा एकत्रित परिणाम होऊन रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे अनियंत्रित स्वरूपात वाढते. अशाच कोरोना बाधित रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका अधिक राहू शकतो. अजून एक साथ आली आहे अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घ्या
ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांनी नाक चोंदणे, दातदुखी, डोकेदुखी, दृष्टी अंधूक होणे, डोळे लाल होणे, टाळूला काळे किंवा लाल चट्टे दिसणे, डोळ्याखाली दुखणे, चेहऱ्यावर वेदना किंवा सुन्न वाटणे, पापण्या खाली पडणे, नाकातील स्राव किंवा रंग बदलणे, नाकातून रक्त येणे, रक्ताची उलटी होणे अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ दंतरोग तज्ज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ म्हणजेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून करून घ्यावी. त्याचप्रमाणे ज्यांना डायबेटीस आहे, अशांनी नियमित रक्तातील साखर तपासून घ्यावी. साखरेचे प्रमाण वाढलेले आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन साखर नियंत्रित करावी. रक्तातील साखरेचे प्रमाण हे १६०पेक्षा अधिक असणे धोक्याचे ठरू शकते. तसेच कोरोना आजारात व नंतर शरीरातील रक्त घट्ट होण्याचा कल वाढतो. त्यामुळे पक्षाघात, लकवा, चेहऱ्याचा लकवा होऊ शकतो. त्यामुळेच ज्यांना बी. पी., शुगर, किडनी व इतर आजार आहे, त्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
म्युकरमायकोसिस या आजाराच्या निदानासाठी रक्ततपासणी, एक्स रे, सी.टी. स्कॅन, एम. आर. आय ,किंवा नाकाद्वारे स्कोप टाकून पाहणे इत्यादी तपासण्या करण्यात येतात. तपासणीत काळी बुरशी असल्याचे निष्पन्न झाल्यास ऑपरेशन करून बुरशी खरवडून काढून टाकली जाते. त्यानंतर बुरशीविरोधी इंजेक्शन्स व इतर औषधोपचार केले जातात.
रुग्णांची साखर नियंत्रणात ठेवल्यास औषधोपचाराचा शंभर टक्के सकारात्मक परिणाम दिसून येतो व रुग्ण बरे होण्यास मदत होते.
टाळण्यासाठी हे करा
जलनेती, दररोज स्वच्छ मास्क वापरणे, एकटे असताना व घरात मास्कचा वापर न करणे, नियमित रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाबाची तपासणी करावी, योग्य आहार व व्यायाम, लिंबू वर्गातील फळांचा वापर, कोवळ्या उन्हात बसणे, प्रतिकार शक्ती वाढवणे, प्राणायाम, योगासने याचा नियमित अवलंब करणे, दररोज पूर्ण झोप घेणे, स्वछता पाळणे, जोखीम असलेल्या व्यक्तींनी धूळ, धूर इ.ठिकाणी मास्कचा वापर करावा.
-------------------------------------------------