मुंबईला ड्युटी नको रे बाबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:51+5:302021-03-29T04:10:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनातर्फे आताही दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पाठवत ...

Don't be on duty in Mumbai, Baba .. | मुंबईला ड्युटी नको रे बाबा..

मुंबईला ड्युटी नको रे बाबा..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे दिवसेंदिवस मुंबईतील परिस्थिती अवघड होत असतांना, महामंडळ प्रशासनातर्फे आताही दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पाठवत आहे. मुंबईहुन आल्यानंतर बहुतांश कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांमधून मुंबईला ड्युटीला जाण्यासाठी प्रचंड विरोध होत आहे.

मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जळगाव विभागातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्या पासून कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येत आहे. दर आठवड्याला जिल्हा भरातून विविध आगारांचे एकूण ५० चालक व वाहक मुंबईला जात आहेत. मात्र, त्या ठिकाणाहून आल्यानंतर यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य खालावले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच मुंबईला जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. आता तर आठ ऐवजी पंधरा दिवस सेवा बजाविण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. महामंडळाच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत असून, परिणामी कामगार संघटनांनी या निर्णया विरोधात आंदोलन पुकारण्याची तयारी दर्शविली आहे.दरम्यान,

मुंबईला राहण्याची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात येत असून, फक्त जेवणासाठी २५० रुपये भत्ता देण्यात येत आहे. मात्र, जादा वेतन ना इतर कुठलेही लाभ देण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमधून सुरुवातीपासूनच तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव विभागातील कर्मचारी मुंबई येथे बेस्टच्या वाहतुकीला जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. तसेच त्यांच्या कुटूंबियांनाही यातून लागण होत आहे. आता तर ८ दिवस ऐवजी १५ दिवस मुंबईला जाण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आमच्या विभागावर अन्याय होत आहे. हे आदेश रद्द व्हावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. अन्यथा संघटनेतर्फे महामंडळा विरोधात आंदोलन पुकारण्यात येईल.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना, जळगाव विभाग

इन्फो :

मुंबईत कोरोनाची परिस्थिती खूप भयावह आहे. खूप भीतीने काम करावे लागते.मात्र, योग्य ती खबरदारी घेऊनही अनेक कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. महामंडळ प्रशासनाने तात्काळ आमची मुंबईची सेवा थांबवावी.

एक वाहक, जळगाव आगार

इन्फो :

जळगावला कोरोनाची लागण न झालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र मुंबईत सेवा बजावण्यासाठी गेल्यावर कोरोना झाला. या संसर्गामुळे काही कर्मचाऱ्यांची प्रकृती खूप खराब झाली. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने मुंबईची सेवा थांबविणे गरजेचे असून, अन्यथा कर्मचारी आंदोलन पुकारतील.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो :

- गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातून १२०० जणांना पाठवले.

चालक ६००

वाहक - ६००

मुंबईहुन परत आल्यानंतर आढळले ५० जण पॉझिटिव्ह

इन्फो :

परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबईतहुन आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.माञ, एकूण किती कर्मचाऱ्यांना लागण झाली, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नसल्याचे आगार प्रशासनतर्फे सांगण्यात आले. तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोरोना व्यक्तीरिक्त वातावरण बदलाचा त्रास होऊन आरोग्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईची ड्युटी नको रे बाबा,असा कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.

Web Title: Don't be on duty in Mumbai, Baba ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.