अहकांराचा वारा न लागो राजसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:25 PM2019-10-10T23:25:45+5:302019-10-10T23:26:17+5:30
वैदिक परंपरेनुसार सर्व भारतात दसरा हा सण साजरा केला जातो. अध्यात्मिक भाषेत सांगावयाचे झाले तर, रावणाचा वध किंवा रावण ...
वैदिक परंपरेनुसार सर्व भारतात दसरा हा सण साजरा केला जातो. अध्यात्मिक भाषेत सांगावयाचे झाले तर, रावणाचा वध किंवा रावण दहन याचा अर्थ अहंकारावर विजय मिळवणे, असा होतो. वारकरी संतांनी म्हटले आहे, अभिमान असावा मात्र अहंकार नसावा. स्वत:च्या कर्माचा अभिमान जरूर असावा मात्र अहंकार नसावा. अभिमान व अहंकार यांच्यातला फरक संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या ९व्या अध्यायात अत्यंत सुंदर पध्दतीने मांडला आहे. अभिमान म्हणजे, ‘काम मी करू शकतो आणि अहंकार म्हणजे ‘काम मीच करू शकतो..’ अभिमान आणि अहंकार यातला फरक म्हणजे ‘मी आणि मीच’ याला फरक आहे.यासाठीच संत नामदेवांनी देवाला मागणे मागितले आहे.
अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझिया विष्णूदासा भाविकांसी। संत नामदेव।।. संत नामदेवांनी मागताना म्हटले, अहंकार तर सोडा, अहंकाराचा वारादेखील माझ्या वैष्णव-वारकऱ्यांना लागू नये! अहंकारामुळे माणसाने पतन होते, हे गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे आणि अहंकार फक्त साधू संतांच्या संगतीनेच जातो आणि म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, दसरा दिवाळी तोचि आम्हा सण।सखे संतजन भेटतील।संत तुकाराम।। अहंकार रुपी शत्रूवर विजय मिळवूया! व जीवन सुखमय-आनंदमय करू या!!
-डॉ. कैलास पाटील, पिपळेसीम, ता. धरणगाव