परीक्षांचे मोठे आव्हान असताना संचालकांना कार्यमुक्त करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:13+5:302021-05-28T04:13:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.पी. पाटील यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.पी. पाटील यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे संचालकपदावर नियुक्ती झाली आहे. पण, विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांचे मोठे आव्हान असताना संचालकांना कार्यमुक्त करणे, हे विद्यार्थी हिताचे नाही. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे केली आहे.
सद्य:स्थितीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व महत्त्वाच्या पदांवर प्रभारी पदभार सोपविला आहे. केवळ परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक हे एकमेव पद नियमित आहे. मात्र, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांची मुक्त विद्यापीठातील परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या एकमेव नियमित असलेल्या पदावरसुद्धा आता प्रभारी अधिकारी नेमण्याची वेळ आली आहे. सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. काही परीक्षांचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षांचे मोठे आव्हान सुरू असताना, संचालकांना कार्यमुक्त करणे, हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे कार्यमुक्त करू नये, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एल.पी. देशमुख, दीपक पाटील यांनी केली आहे.