'चिंग्या' याला जिवंत सोडू नकोस..,याला गोळ्या घाल...' दुश्मनाला दवाखान्यात दाखल केले म्हणून तरूणावर गोळीबार
By सागर दुबे | Published: April 21, 2023 07:57 PM2023-04-21T19:57:30+5:302023-04-21T19:57:38+5:30
गोळी चुकविली अन् वाचले प्राण ; आसोदा गावाजवळील घटना
जळगाव : दुश्मनाला दवाखान्यात दाखल केल्याच्या कारणावरून योगेश दिंगबर कोल्हे (३१, रा.आसोदा) या तरूणावर सराईत गुन्हेगार चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (३२, रा.गणेशवाडी) याने गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास आसोदा गावाजवळील हॉटेल आर्यासमोर घडली.
या प्रकरणात पोलिसांनी चिंग्यासह त्याचा साथीदार केयूर कैलास पंदाणे (२१, रा. शिवाजीनगर) यांना धरणगाव तालुक्यातील वाकटूकी शिवारातून अटक केली असून त्यांच्याविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून तीन खाली झालेले काडतूस सुध्दा जप्त केलेले आहे.
योगेश कोल्हे हा आसोदा येथे आई-वडील, पत्नीसह वास्तव्यास आहे. सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी लखन उर्फ गोलू मराठे आणि ललित उर्फ सोनू चौधरी यांच्यामध्ये शिवतीर्थ मैदानाजवळ वाद होवून चौधरी याच्या हातावर वार करण्यात आले होते. त्यामुळे जखमी मित्राला योगेश याने उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले होते.
हे चिंग्याच्या मित्रांनी पाहिले होते. म्हणून एक महिन्यापूर्वी चिंग्या याने योगेश याला कॉल करून तू माझ्या दु्श्मन ललित चौधरी याला दवाखान्यात ॲडमिट करताना माझ्या मित्रांना तुला पाहिले असून तू त्याला दवाखान्यात का दाखल केले. तुला तर मी आता जीवंत सोडणार नाही असे बोलून घाण-घाण शिवीगाळ केली होती. त्यानंतर वारंवार चिंग्या हा योगेशला कॉल करून त्रास देत होता.
मित्रांसोबत कट्टयावर बसलेला अन् झाला गोळीबार...
शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास योगेश हा त्याचे मित्र कल्पेश माळी व वैभव सपकाळे (दोन्ही रा. आसोदा) यांच्यासोबत आसोदा गावाजवळील हॉटेल आर्या समोरील सिमेंटच्या कट्टयावर बसलेले होते. अचानक त्यांना बंदूकीतून दोन गोळ्या झाडल्याचा आवाज झाला. योगेश याने रस्त्यावर येवून पाहिल्यानंतर त्याला चिंग्या दुचाकीवर मागे बसलेला तर केयूर हा दुचाकी चालविताना दिसून आला. त्यानंतर केयूर हा पळत आला आणि योगेश पकडून ठेवून 'आज याला जीवंत सोडू नकोस, याला गोळ्या घाल' असा चिंग्याला आवाज दिला. चिंग्याने लागलीच त्याच्या दिशेने बंदुकीतून एक गोळी झाडली. मात्र, योगेशने ती चुकविली त्यामुळे तो जखमी झाला नाही. नंतर त्याने केयूर याला झटका देवून तेथून पळ काढला. घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार कुटूंबियांना सांगितल्यानंतर पोलिसांनी देखील घटनेची माहिती दिली.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
आसोद्यात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचा-यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घेवून त्यांनी संशयितांचा शोधार्थ तीन पथक रवाना केले.
तीन रिकामे काडतूस सापडले...
चिंग्याच्या बंदुकीतून तीन फायर राउंड झाल्यामुळे पोलिसांनी हॉटेलच्या परिसरामध्ये रिकामे काडतूस शोधण्यास सुरूवात केली. काही वेळानंतर त्यांनी तीन रिकामे काडतूस मिळून आल्यानंतर ते जप्त करण्यात आलेले आहे.
वाकटूकी शिवारत होते लपलेले...
दरम्यान, गोळीबारानंतर चेतन उर्फ चिंग्या आळंदे आणि केयूर कैलास पंधारे हे दोघे धरणगाव तालुक्याच्या दिशेने पळाले होते. त्यानंतर वाकटूकी शिवारातील एका शेतामध्ये दोघे लपून बसले होते. शुक्रवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी गाठल्यानंतर संशयितांच्या शोधार्थ तीन पथक रवाना केले होते. त्यात एका पथकाला दोघांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना वाकटूकी शिवारातून अटक करण्यात आली. नंतर दोघांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सुध्दा तालुका पोलिस ठाणे गाठून दोघांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची माहिती दिली. दरम्यान, योगेश हा दुश्मनांसोबत राहत असल्याचा राग चिंग्या याच्या मनात असल्याचे कारण देखील तपासात समोर आले आहे. तसेच गुन्हेगार चिंग्या याला न्यायालयाने जळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये बंदी घालण्यात आली आहे. तरी तो जळगावात पोलिसांना मिळून आला आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौभे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने केली आहे.
दोघांविरूध्द गुन्हा दाखल
दुपारी योगेश कोल्हे याच्या फिर्यादीवरून चिंग्या आणि केयूर यांच्याविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.