H3N2: खो खो खोकता तरीही घाबरू नका; औषधे घ्या, ताप उतरेपर्यंत आराम करा!, एच ३ एन २ वर औषधही उपलब्ध
By अमित महाबळ | Published: March 11, 2023 05:40 PM2023-03-11T17:40:36+5:302023-03-11T17:41:23+5:30
H3N2: कोरोनानंतर ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’ने सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव शहरातही सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहे.
- अमित महाबळ
जळगाव : कोरोनानंतर ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच३एन२’ने सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे जळगाव शहरातही सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहे. मात्र, या आजाराला घाबरू नका. वेळीच औषधोपचार घ्या, आराम करा आणि कोरोनातील त्रिसूत्रीचे पालन करा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
विषाणूंसोबत वातावरणातील प्रदूषण, धूळ यामुळेही सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. इन्फ्लूएन्झाचा विषाणू हवेतून पसरणारा आहे. त्यामुळे कोरोनात घेतली तशी काळजी आताही घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी सकस व पौष्टिक आहार घ्या, आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा, घरी आल्यावर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा, लहान मुले आजारी असल्यास त्यांना शाळेत पाठवू नका, शाळांनीही तशा सूचना विद्यार्थ्यांच्या पालकांना कराव्यात. दवाखान्यात तपासणीला येणारे १० पैकी ८ रुग्ण हे ताप, सर्दी व खोकल्याचे आहेत. इन्फ्लूएन्झाच्या प्रकाराची लागण झालेले हे रुग्ण आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
त्याला घाबरू नका
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितले, की फ्लू अनेक अनेक विषाणूंनी होतो. त्यापैकी ‘एच३एन२’ हा नवीन उपप्रकार जागतिक आरोग्य संघटनेला आढळून आला आहे. त्याला घाबरण्याची गरज नाही. थकवा, सर्दी, खोकला, दम लागणे, ताप, अंगदुखी आदी लक्षणे यामध्ये दिसतात. यावर औषध उपलब्ध आहेत; पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.
हा बदल होताच रुग्ण घटतील
जळगाव जिल्ह्यात वातावरण स्थिर नाही. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असते. वातावरणात सतत होणारे बदल आता राज्यात सगळीकडे होताना दिसत आहेत. ढगाळ हवामानात विषाणू पसरतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या बाहेरदेखील रुग्णसंख्या वाढत आहे. पूर्ण ऊन पडेल तेव्हाच रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल. मास्क लावण्यासह इतर काळजी घ्यावी.
- डॉ. चेतन खैरनार
ही घ्या काळजी
- रुग्णांनी ताप जात नाही तोपर्यंत आराम करावा
- भरपूर पाणी प्यावे
- ताप वाढू नये म्हणून औषध घ्या
- मास्क लावा
- आजारी असताना गर्दीत जाणे टाळा
- हात स्वच्छ धुवत राहा