पातोंडा परिसरात दुबार व रखडलेल्या पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:51+5:302021-07-17T04:13:51+5:30
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडासह परिसरात तब्बल एक महिन्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरिपाच्या रखडलेल्या व दुबार ...
पातोंडा, ता. अमळनेर :
पातोंडासह परिसरात तब्बल एक महिन्यानंतर पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरिपाच्या रखडलेल्या व दुबार पेरणीला पुन्हा सुरुवात झाली आहे.
पातोंडासह परिसरात मृग नक्षत्रात काय पण कोणत्याच नक्षत्रात पाऊस झाला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अल्पसा पाऊस झाला. बहुसंख्य शेतकऱ्यांनी पाऊस पडणारच या आशेवर कापसाची लागवड व मूग आदी पिकांची लागवड करून टाकली. तर काहींनी धूळ पेरणी केली. परंतु संपूर्ण जून महिना संपला. जुलैचा पहिला पंधरवडा संपत आला. पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या. पाऊसच नसल्याने लागवड झालेली कापसाचे कोंब जळाले. पहिली लागवड व पेरणी वाया गेली, मात्र १३ रोजी बऱ्यापैकी व १५ जुलै रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने पुन्हा मोडून आलेल्या पेरणीला व कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली. या वर्षीच्या खरीप हंगाम वाया जाणार अन् पाऊस आलाच तर पन्नास टक्के उत्पादन घटणार. अशा संकटात सापडलेल्या बळीराजाला काहीच सुचेनासे झाले. मात्र या पावसाने पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत.