जीएमसीत तीन महिन्यांत प्रथमच आपत्कालीन कक्ष खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:18 AM2021-05-21T04:18:17+5:302021-05-21T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या लाटेत गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांत प्रथमच गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या लाटेत गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांत प्रथमच गुरुवारी आपत्कालीन कक्षात एकही रुग्ण दाखल नव्हता, यासह सीटू कक्षातील ३० बेड रिक्त होते. रुग्ण कमी येत असल्याने हे दिलासादायक चित्र होते. दरम्यान, कोरोनाचा आलेख घसरत असून जळगाव शहरात नवे ५० रुग्ण आढळून आले आहे. त्यापेक्षा तिपटीने रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे शहरात गुरुवारी एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नव्हती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यूचे प्रमाणही गेल्या तीन दिवसांपासून कमी झाले आहे. गुरुवारच्या अहवालांमध्ये या ठिकाणी दोन मृत्यूंची नोंद होती. दरम्यान, रोज पंधरा-पंधरा मृतदेह न्यावे लागत होते. आता हीच संख्या दिवसाला तीनवर आल्याचे शववाहिका चालकांचे म्हणणे आहे.
सर्वाधिक ४७ रुग्ण चोपडा शहरात आढळून आले आहेत. त्याखालोखाल जळगाव शहरात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्याही घटत आहे. ही संख्या ९६० वर आलेली आहे. गुरुवारी प्रथमच नवे रुग्ण व बरे होणारे रुग्ण यात ३१८ रुग्णांची तफावत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटून ९१४३ वर आली आहे.