जि.प. सदस्य, नगरसेवकांकडून आदेश झुगारून उमेदवारी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:26 PM2017-08-29T16:26:28+5:302017-08-29T16:28:59+5:30
मतदान होणार असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली: ग्रामीण गटात भाजपा ठरणार किंगमेकर
लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.२९- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीत विविध पक्षाच्या गटनेत्यांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील काही जि.प. सदस्य व नगरसेवकांना माघार घेण्याचे आदेश देऊनही ते आदेश झुगारून या सदस्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया राबवावी लागणार असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. २०१२-१३ मध्ये डीपीडीसीच्या निवडणुकीवेळी माघारीच्या मुदतीनंतरही माघारीचे प्रयत्न होऊन जवळपास सर्वच अतिरिक्त उमेदवारांनी जाहीर माघार घेतली होती. मात्र माघारीची मुदत उलटून गेली असल्याने मतदानाची औपचारीकता फक्त पार पाडावी लागली होती. मात्र यंदा जि.प. सदस्य व त्यापेक्षाही पालिका गटात नगरसेवकांनी वरिष्ठांचे आदेश धुडकावत उमेदवारी कायम ठेवली आहे. पालिका गटात ७ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची मुदत संपलेली असल्याने आता जाहीर माघार घेतली तरी प्रशासनाला निवडणुकीची प्रक्रिया करावीच लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयात मतदान केंद्र करावे लागेल. तसेच मतदानात पसंतीक्रम असल्याने मतमोजणीची प्रक्रियाही किचकट राहील. ग्रामीण गटात भाजपा किंगमेकर ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील दोघे राष्टÑवादीचे उमेदवार असून एक उमेदवार शिवसेनेचा आहे. वास्तविक गटनेत्यांच्या बैठकीत या दोन पैकी एका जागेवरच राष्टÑवादीने उमेदवार द्यायचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जि.प. सदस्यांनी आपसातील वादामुळे वरिष्ठांचे आदेश डावलत उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र राष्टÑवादीचेच सदस्य एक नंबर राष्टÑवादी तर दुसरा नंबर शिवसेनेला देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राष्टÑवादीचा तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे. मात्र भाजपानेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी पडद्याआडून ही खेळी केलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तीन उमेदवारांमध्ये भाजपाचा उमेदवार नसल्याने भाजपाने जर राष्टÑवादीच्याच दोन्ही उमेदवारांना मतदान केले तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. त्यामुळेच कदाचित राष्टÑवादीच्या उमेदवारांनी तडजोडीत ठरलेले असतानाही माघार घेतली नसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.