‘डिपीडीसी’त अधिकारी फैलावर दुसरीकडे वाळू माफिया गिरणेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:02 PM2020-01-21T13:02:31+5:302020-01-21T13:02:53+5:30
अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष : गिरणा पुलानजीक भरली वाळू वाहतूक करणाºया वाहनांची जत्रा
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळू प्रश्नावर वातावरण गरम असताना त्याचवेळी दुसरीकडे वाळू माफिया गिरणा नदीत वाळूची तस्करी करण्यात मग्न असल्याचे चित्र सोमवारी जाणवले.
ग्रामस्थ व प्रसारमाध्यमांनी गिरणा नदीत सुरु असलेल्या वाळू उपश्याबाबत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर गेल्या आठवड्यात प्रशासनाने कारवाई केली. मात्र, ही कारवाई केवळ दिखावा होता, कारण कारवाईला आठवडा उलटत नाही तोच गिरणा नदीपात्रात वाळू माफियांनी हैदोस घातला. सोमवारी बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू माफियांची अक्षरश जत्रा भरल्याचे चित्र होते.
सोमवारी महसूलचे सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीच्या बैठकीत व्यस्त असताना दुसरीकडे गिरणा नदी पात्रात वाळू माफियांकडून नदीचे अक्षरश लचके तोडण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे आमदार संजय सावकारे यांनी तर जिल्हाधिकाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याचे सांगून प्रशासनातील वस्तूस्थिती सर्वांच्या समोर ्रआणली.
जबाबदारी झटकून ग्रा.पं.वर वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी
शुक्रवारी महसूल विभागाच्या झालेल्या बैठकीत वाळू चोरी रोखण्याचे काम आता ग्राम पंचायतीवर सोपविले आहे. महसूल प्रशासनाकडून केवळ जबाबदारी झटकण्याचे काम सुरु आहे. ग्रामपंचायतीवर जबाबदारी सोपविली तर महसूल विभाग कारवाई करणार नाही का? वाळू चोरीत महसूलसह कोणत्या यंत्रणेचा सहभाग आहे, याची नेहमीच ओरड झाली आहे. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतच ठराव देत नसल्याची स्थिती आहे.
‘गिरणा’ पोखरल्यानंतर आता ‘तापी’ ला केले जातेय लक्ष्य
नागझिरीपासून ते गाढोदापर्यंतच्या गिरणा नदीच्या ४५ किमीच्या पट्टयात वाळू माफियांनी अक्षरश हैदोस माजवून नदी पोखरून टाकली आहे. अनेक ठिकाणी तर वाळू पुर्णपणे संपल्यानंतर नदीपात्रात खडक दिसायला लागले आहेत. गिरणा नदी पोखरल्यानंतर आता वाळू माफियांनी आपली नजर तापी नदीकडे फिरवली आहे. विदगाव, सावखेडा, किनोद, कठोरा, भादली, भोकर व चोपडा तालुक्यातील खेडी-भोकरी या भागातील तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु झाला आहे. मात्र, महसूल प्रशासनाने वाळू माफियांसोबतच मिलीभगत असल्याने आता वाळूमाफियांना कारवाईची भिती राहिलेली नाही.