जळगावातील समांतर रत्यासाठी १३९ कोटींचा डीपीआर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:28 PM2018-04-01T12:28:09+5:302018-04-01T12:28:09+5:30
समांतर रस्त्यासह महामार्गाची होणार दुरुस्ती
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - शहरवासीयांचा जिव्हाळ््याचा विषय असलेल्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामाचा १३९ कोटींचा डीपीआर (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नहि) नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये समांतर रस्ते करण्यासह सध्या असलेल्या महामार्गाची दुरुस्ती करण्यात येणार असून यास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाची दुरवस्था होऊन दररोज अपघात होत आहे व कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे महामार्गाची दुरुस्ती, चौपदरीकरण व समांतर रस्ते अशा मागणीसाठी विविध संघटनांकडून अनेक आंदोलन झाले.
त्यानंतर १० जानेवारी रोजी झालेल्या महामार्ग रोको दरम्यान समांतर रस्त्यासाठी १०० कोटी मंंजूर झाल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले होते. मात्र मध्यंतरी हा मार्ग नहिकडे नसल्याने १०० कोटी मिळू शकत नसल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले होते.
या सर्व घडामोडीनंतर गेल्या महिन्यात लोकप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्या वेळी १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले होते. या १२५ कोटी रुपयांच्या बदल्यात मालविय कंपनीने सुमारे १३९ कोटी रुपये खचार्चा डीपीआर सादर केला आहे. हा डीपीआर गेल्या २३ मार्चला सादर झाला असून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.
समांतर रस्ते व महामार्ग दुरुस्ती
या डीपीआरमध्ये समांतर रस्ते, भुयारी मार्ग तयार केले जाणार असून सध्याचा आहे त्या महामार्गाची दुरुस्ती प्रस्तावित आहे.
आतापर्यंत किमान तीन डीपीआर तयार झाले. जळगाव मनपाच्या ताब्यातील सर्व्हिस रोड हे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणकडे वर्ग झालेले नव्हते, त्यामुळे निधीसाठी अडचणी येत असल्याचे मध्यंतरी सांगितले जाऊ लागले. मात्र ही कार्यवाही पूर्ण झाली आहे.
दरम्यान, १ एप्रिल रोजी काम सुरू होण्याचे सांगितले जात होते, आता डीपीआर मंजुरीसाठी गेला असून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कधी कामाला सुरूवात होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे.