डॉ.आंबेडकरांच्या साहित्याने समाज मनाला दिली नवी दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 03:27 PM2019-12-01T15:27:14+5:302019-12-01T15:27:48+5:30
येत्या शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत अभ्यासक डॉ.मिलिंद बागुल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा घेतलेला आढावा...
ज्ञानतपस्वी भारतरत्न डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रचंड अशा ज्ञानाच्या बळावर तळागाळातल्या गोरगरीब, आदिवासी समाजातील उपेक्षित घटक, बहुजनांचा, स्त्रियांचा आणि एकूणच प्रस्थापित समाज व्यवस्थेचा इतिहासच बदलवून टाकत भारताचा नवा चेहरा जगासमोर आणला. ते इतिहासकार, अर्थतज्ज्ञ, मानववंशास्त्राचे गाढे अभ्यासक, धर्म, कायदा याविषयी त्यांचे असलेले सखोल ज्ञान, त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील त्यांची ज्ञानाची व्यासंगता लक्षात घेता त्यांच्या लेखनाचे काही विभाग करता येतील. ज्यांत त्यांनी स्वत: लिहिलेले आणि त्यांच्यासमक्ष प्रकाशित झालेले, त्यांनी स्वत: लिहलेले परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालेले, त्यांच्या भाषणाला, लेखाला, पत्राला त्यांच्या पश्चात प्रकाशित करता आले. या साऱ्या साहित्याने समाजमनाला एक नवी दिशा दिलेली आहे़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी १९१५ला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम़ए़च्या पदवीकरिता ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन व अर्थनीती या विषयावर प्रबंध सादर केला. या शोधनिबंधाच्या पानांची संख्या केवळ ४२ होती. पुढे हाच शोधनिबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आला. यात इ़स़ १७१२ ते १८५२ या काळातील इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राज्य कारभार व वित्त नीतीच्या विविध अशा धोरणांचा ऐतिहासिक आढावा
घेतला आहे़ इस्ट इंडिया कंपनीने जी धोरणे भारतात राबविली ती भारतीयांच्या हालअपेक्षाना कशी कारणीभूत ठरली त्याचे वास्तव, विदारक चित्र त्यांनी मांडले आहे़ ‘भारतातील जाती संस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास या शोधनिबंधात डॉ़बाबासाहेबांनी भारतातील जातींचे सखोल असे अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत आणि पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित होऊन मानववंशातील महत्त्वपूर्ण गं्रथ म्हणून वाचकांना अभ्यासता येतोय़ १९१६ ला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेट पदवीसाठी डॉ़ आंबेडकरांनी अर्थशास्त्रविषयक ‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा’ हा प्रबंध सादर केला़ भारतातील आर्थिक प्रश्नांचा अतिशय सखोल अभ्यास करून एक ऐतिहासिक पृथ:करणात्मक विचार मांडून पुस्तकरूपाने अर्थशास्त्रविषयक विचार दिला. हा गं्रथ अर्थतज्ज्ञांमध्ये महत्त्वाचा मानला जातो़
२९ जानेवारी १९३९ पुण्यातील गोखले इस्टिट्युटमध्ये आयोजित केलेल्या कार्यस्मृती व्याख्यानमालेत डॉ़आंबेडकरांनी व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाचे संघराज विरुद्ध स्वातंत्र्य या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले़
१९२२ साली लंडन विद्यापीठातील लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्समध्ये डॉ.एडविन कॅनन यांच्या अनुमतीने डॉ़आंबेडकरांनी डॉक्टर आॅफ सायन्स या पदवीसाठी ‘रुपयाचा प्रश्न, त्याचा उगम व त्यावरील उपाय’ या विषयावरील प्रबंध सादर केला. हा पुढे ऐतिहासिक गं्रथ म्हणून नावारूपाला आला़ ज्यात त्यांनी भारतीय चलनाच्या उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा केली आहे़ प्रामुख्याने भारतासाठी आदर्श अशी कोणती चलनपद्धती असू शकते हेदेखील त्यांनी मांडले आहे़ या ग्रंथात मांडलेल्या विचारांचे फलित म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक होय. ब्रिटिशांच्या भारतातील चलन व्यवस्थेच्या चुका दाखवून डॉ़आंबेडकरांनी त्यांवरील उपायदेखील मांडलेले आहेत़ पाकिस्तान अथवा भारताची फाळणी या पुस्तकात त्यांनी फाळणीची मागणी होत असताना गंभीर अशा प्रश्नावर अभ्यासपूर्ण शैलीत भारत हिताच्या दृष्टीने त्यांनी दिलेली उत्तरे विशेष अशी आहेत़ लाहोर येथील जातपात तोड मंडळाने आयोजिलेला परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ़बाबासाहेबांची निवड करण्यात आली होती़ आयोजकांनी भाषण मागविले. त्यावर मंडळाने हरकत घेऊन या लिखित भाषणात त्यांनी अभ्यासपूर्ण व परखड भाषेत आपले विचार मांडले होते़ ते पुढे पुस्तकात आले. ‘जातीचे निर्मूलन’ नावाचे पुस्तक प्रकाशित होऊन वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले़
१८ जानेवारी १९४२ ला न्या.रानडे यांच्या जयंतीनिमित्त डेक्कन सभेने गोखले मेमोरियल सभागृहात रानडे-गांधी व जिजामाता विषयावर डॉ़आंबेडकरांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते़ यात या तिनही परस्पर विरोधी व्यक्तिमत्त्वाबदल त्यांनी तुलनात्मक विश्लेषणात्मक विचार मांडले़ हे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना पुढे उपलब्ध करून देण्यात आले़ श्री.गांधी व अस्पृश्यांची मुक्ती या पुस्तकाला थँकर आणि कंपनी लिमिटेडने प्रकाशित करून अस्पृश्यांच्या अनेक प्रश्नासंबंधी डॉ़आंबेडकरांचे गहन असे विचार पुस्तकातून वाचावयास मिळतात़
दी आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशच्या राजकीय पक्ष अधिवेशनात ६ मे १९४५ रोजी अध्यक्षीय भाषण करताना ‘भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग, त्यातून मार्ग काढणे’ या विषयावर डॉ़आंबेडकरांनी मांडलेले विचार म्हणजेच ‘जातीय पेच व तो सोडविण्याचा मार्ग’ हे पुस्तक होय़ डॉ़आंबेडरांनी यातून भारतीय राजकारणाला नवा विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे़ त्यांच्या विचारांवर भारतीय संविधानानुरूप राजकीय मंडळी मार्गाक्रमण करत गेली तर भारतीय राजकारणाचा चेहरा बदललेला दिसेल.
१९४५ साली प्रकाशित झालेल्या कॉँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले या ग्रंथात डॉ़आंबेडकरांनी, श्रीग़ांधी त्यांच्या अधीन असलेल्या कॉग्रेसने आपण अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी असल्याचा कांगावा केल्याचे मांडून अस्पृश्यांचे सामाजिक, राजकीय दृष्ट्या कसे नुकसान केले यांचे विपूल माहितीच्या आधारावर या ग्रंथाचे लेखन केले आहे़
‘संस्थाने व अल्पसंख्याक’ या पुस्तकाचे थॅकर अॅण्ड कंपनीने प्रकाशन केले. मूळात स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये संस्थाने व अल्पसंख्याक जाती यांचे हक्क कोणकोणते असतील व ते कशाप्रकारे समाविष्ट करता येतील यासंदर्भात दी आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे घटना समितीला अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे निवेदन इंग्रजी भाषेत देण्यात आलेले आहे़ ते निवेदनच पुस्तक पाने प्रकाशित करण्यात आले आहे़
-डॉ. मिलिंद बागुल, जळगाव