डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनला प्रदान
By विलास बारी | Published: January 7, 2024 09:15 PM2024-01-07T21:15:12+5:302024-01-07T21:15:21+5:30
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात अशोक जैन यांनी स्वीकारला पुरस्कार
जळगाव : हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार रविवारी जैन इरिगेशन सिस्टिम लि.ला प्रदान करण्यात आला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन रविवारी संगमनेर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, कर्नाटकचे मंत्री एच.के.पाटील,काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, सन्मानपत्र, एक लाखाचा धनादेश, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन आणि त्यांच्या समवेत परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना हा पुरस्कार अर्पण करत असल्याचे सत्कारास उत्तर देताना अशोक जैन यांनी सांगितले.
या पुरस्काराची एक लाख रक्कम न स्वीकारता त्यात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या वतीने दहा लाख असे एकूण ११ लाख रुपये बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देण्याचे अशोक जैन जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.