डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विशेष : महामानवाच्या विचारातून माणसाला माणूसपण शिकविण्याचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:18 PM2019-04-14T13:18:35+5:302019-04-14T13:19:05+5:30
गाणी, पथनाट्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार
जळगाव : शोषीत, वंचित समाजाच्या न्याय, हक्कासाठी रात्रंदिवस लढा देणारे राज्यघटनेचे शिल्पकार व महामानव भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा, बाबासाहेब हे केवळ एका समाजासाठी मर्यादीत नाही तर माणसाला माणूसपण शिकविण्याचे सर्वसमावेशक असे त्यांचे महान कार्य होते़ हा संदेश जनतेपर्यंत पोहचावा, यासाठी शहरात विविध संस्था, संघटना साहित्यिक आजही झटत आहे़ बाबासाहेबांच्या विचारांना आठवून त्यांचे आचरण हेच खरे महामानवाला अभिवादन ठरेल़, अशी प्रेरणा या संस्था, संघटनांच्या कार्यातून मिळते़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त या संस्था, संघटनांच्या कार्याची घेतलेली दखल़़़ आणि आढावा....
पाणी बचतीवर जनजागृती
शहरातील स्वर संगिनी ग्रुप हा २०१३ पासून गाणी व पथनाट्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करीत आहे़ ग्रुपमध्ये एकूण १४ सदस्य आहेत़ आजपर्यंत या ग्रुपचे प्रबोधनात्मक हजारो कार्यक्रम झालेले आहेत़ गु्रपचे संचालक चंद्रकांत इंगळे यांनीही गाण्याच्या माध्यमातून पाणीबचतीवर जनजागृती केलेली आहे़ १४ एप्रिलला विविध ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून कार्यक्रम सादर होणार आहेत. यासह स्वराज्य सामाजिक संस्कृती या ग्रुपच्या माध्यमातूनही लोककलेद्वारे जनजागृती केली जाते़ गेल्या वर्षी गु्रपने नाटीका सादर करून दाद मिळविली होती़
सूर्यजीवनी वाचनालय
शहरातील बीएसएनल कार्यालयाच्या मागील बाजूस डॉ़ भिमराव आंबेडकर सूर्य-जिवनी वाचनालय आहे़ अगदी माफक दरात विद्यार्थ्यांना येथे स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात़ यासह या वाचनालयातर्फे दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात़ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते़ नुकत्याच वाचनालयातर्फे स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या़ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून मोठी बक्षिसेही देण्यात आली़
अजिंठा हाऊसिंग सोसायटी
शहरातील अजिंठा चौफुल्लीवर असलेल्या अजिंठा बॅकवर्ड गृहनिर्माण सहकार संस्था येथे ९० कुटुंबीय वास्तवास आहे़ १५ संस्थापक सदस्यांनी १९६५ पासून ही संकल्पना मांडली व नोकरी करून सायंकाळी एकत्र जमून यासंदर्भात सर्व नियोजन केले.
१५ मे १९७२ मध्ये संस्थेची नोंदणी झाली़ हळू हळू कुटुंब वाढत गेले़ या ठिकाणी १९८० पासून तरूणांनी उत्सव समिती नेमन त्या माध्यमातून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास सुरूवात केली़ यात विविध वैचारिक प्रबोधनाच्या कार्यक्रमासह नाटक, मिरवणुका, विविध स्पर्धा आदी उपक्रम राबविले जातात़ गेल्या वर्षी १२७ झाडे लावण्यात आली होती़
त्र्यंबक मराठे, रामभाऊ शेजवळे, वसंत बिºहाडे, जनार्दन सोनवणे, रतन सावरे, गोविंद कोचुरे, तोताराम वाघ, वसंत सपकाळे, मनुबाई सुरवाडे, उखा शिंदे, माधव शेजवळे, आेंकार कोचुरे हे या गृहनिर्माण सोसायटीचे संस्थापक सदस्य आहेत़ बाबूराव वाघ हे गेल्या १५ वर्षांपासून येथे चेअरमन आहेत़
साहित्यिकांनी टाकला प्रकाश
जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी बाबासाहेबांच्या विचारांवर साहित्याच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे़
त्यात मिलिंद बागुल यांचा कविता संग्रह ‘संदर्भ माझ्या जातीचे ’ हा २०१२ मध्ये प्रकाशीत झाला आहे़ यासह प्रल्हाद खरे यांनीही कथा संग्रह व कवितासंग्रहाच्या माध्यमातून डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले आहे़
कथा नारायण गोविंदा आणि त्याच्या मुलांची, अंधश्रद्ध अनिष्ठरूढी परंपरा, मन आणि इतर, यासह मनातले विचारपीठ व माय म्हणाली हे कवितासंग्रह त्यांनी लिहीले आहे़ त्याचबरोबर कवी प्रकाश सपकाळे यांचा कवीता संग्रह येत्या डिसेंबर महिन्यात प़्रकाशित होणार आहे.
भालेराव प्रतिष्ठान
शहरातील अप्पासाहेब विश्वाासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे गेल्या १८ वर्षांपासून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येतात़ दरवर्षी १४ एप्रिल रोजी महामानवांच्या जीवनावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येते़ उत्तरे देणाऱ्यांना तत्काळ प्रशिस्तपत्र दिले जाते़ यासह चार दिवसांचा भीम महोत्सव राबविण्यात येतो़
यात कवी संमेलन, क्ले मॉडेलिंग, चित्रकला, भीमगीतांच्ीा स्पर्धा, मिरवणुकांची आरास स्पर्धा घेण्यात येते़ आरास स्पर्धेत २५ संघ सहभागी झाले आहेत. यासह नेहरू चौकात भीम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते़ महामानवांची माहिती देणारे चित्रप्रदशर्न महापालिका इमारतचीच्या तळ मजल्यावर भरविले जाते.
अधिकारी घडविणारे संत चोखामेळा वसतीगृह
भंते सुगतवंस संघनायक महाथेरो यांनी जळगाव शहरात श्री संत चोखामेळा या वसतीगृहाची १९७० साली स्थापना केली़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणाची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या निवासाची व जेवणाची मोफत व्यवस्था म्हणून हे वसतिगृह त्यांनी सुरू केले़ कडकशिस्त, वेळेचे पालन, ध्यान, प्रबोधन या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्याचे कार्य वसतीगृहात सुरू आहे़ आज या वसतीगृहात ५ ते १०वी पर्यंतचे ४८ विद्यार्थी शिकत आहेत़ येथून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहे़ कल्याण येथील भंते संघरत्न हेही या वसतीगृहात येऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन करीत असतात़ विद्यार्थी ग्रामीण भागातील व गरिब कुटुंबातील असावा हा निकष या वसतिगृहात प्रवेशासाठी आहे़
तरूणांचा एक वही एक पेन उपक्रम
डॉ़बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘एक वही एक पेन’ संकलनाचा उपक्रम राबविण्यात येतो़ संकलित केलेले हे साहित्य विविध भागातील गरीब विद्यार्थ्यांना वाटप केले जाते़ अडीच हजारापर्यंत वही आणि पेन संकलित करून शहरातील विविध भागात याचे वाटप केले आहे़ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी फुल, हार न आणता एक वही व एक पेन आणावा व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी, असे आवाहन या मंचने केलेले आहे़ ६ डिसेंबर २०१६ पासून प्रमोद इंगळे, अविनाश बागूल, प्रशांत सोनवणे, सत्यनारायण पवार, सचिन बडगे, पंकज नन्नवरे या तरूणांनी हा उपक्रम हाती घेतला आहे़ खेडी तसेच वरणगाव फॅक्टरी येथेही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येतो़ यंदाही १४ एप्रिल रोजी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़
भालेराव प्रतिष्ठानतर्फे
चित्रकला, क्ले मॉडेलिंग स्पर्धा
अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानतर्फे भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ या अंतर्गत शनिवारी चित्रकला व क्ले मॉडेलिंग स्पर्धा पार पडली यात ७५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला़शामा प्रसाद उखर्जी उद्यानात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अशोक खिवसरा यांच्या हस्ते झाले़ काळू यशवंते यांची प्रमुख उपस्थिती होती़ महामानवांच्या जीवनावर आधारीत विविध चित्रांचे सादरीकरण करण्यात आले़ परीक्षण सविता नंदनवार, आम्रपाली सोनवणे यांनी केले़ चित्रकला स्पर्धेत शालेय गटात किशोर सुरवाडे, वेदांत सोनोने, समर्थ पाटील यांना बक्षीस मिळाले तर महाविद्यालयीन गटात रामकिसन पवार, अमोल बावणे, प्रेमराज सारस्वत यांनी यश मिळविले़ यासह क्लेमॉडेलिंग स्पर्धेत गोवर्धन पवार, तेजल वनरा, प्रशांत वारे यांना बक्षीस मिळाले़ सिद्धार्ध लोखंडे, दीपक जोशी, विलास यशवंते, विजय कोसोदे, हरिशचंद्र सानवणे, शरद भालेराव आदींनी परिश्रम घेतले़
नशिराबादला श्रमदानातून बौद्ध विहार
बौद्ध पंच मंडळातर्फे समाज बांधवांच्या श्रमदानातून भव्य बौद्ध विहाराची उभारणी करण्यात आली. सुमारे पंधराशे स्केअर फुट च्या जागेवर सन २०१५ मध्ये बौद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींचे दान न घेता विहारची उभारणी करण्यात आली. त्यात थायलंड इथून गौतम बुद्धांची मूर्ती भिकू संघाने दान दिली आहे. विहारात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आहे. दरवर्षी विविध उपक्रम उत्सव बौद्ध पंचम मंडळातर्फे घेण्यात येतात अशी माहिती समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी दिली. येथील भवानी नगर परिसरात असलेल्या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात आले आहे.